ठाणे : उपचाराअभावी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच रुग्णांच्या मृत्यूनंतर, रुग्णालयाचा अनागोंदी कारभार समोर आला असतानाच, आता गेल्या २४ तासांत १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉक्टर आणि कर्मचारी क्षमता तसेच रुग्णांच्या संख्येत झालेली मोठी वाढ, यामुळे या १८ जणांना जीव गमवावा लागल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. मृतांमध्ये आयसीयूतील १३ आणि इतर ५ रुग्णांचा समावेश आहे. तसेच या रुग्णांना शेवटच्या क्षणी आणले असल्याचा खुलासा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.
रुग्णालय प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा देताना काही रुग्ण खासगी हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी आल्याने, काही रुग्ण ८० पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचा दावा केला आहे, दुसरीकडे सिव्हील रुग्णालय बंद झाल्यापासून सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण इथेच येत असल्याने डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे. १० ऑगस्टला एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला होता.त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन आंदोलन केले होते. आता गेल्या २४ तासांत १८ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री यांचा ठाणे जिल्हा, मुख्यमंत्री यांची ठाणे महानगरपालिका, ठाणे महापालिकेत २५ वर्षांपासून सेनेची सत्ता आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुपर स्पेशलिटी कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन ठाण्यात केले होते, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी देखील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे, मात्र हे करत असताना सर्वात जुने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय दुर्लक्षित झाले आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.