ठाणे : ठाणे महापालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या १६ झोपडपट्टी पुनर्विकास योजना क्लस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने या योजना रखडल्या होत्या. आमदार संजय केळकर यांच्या चौफेर पाठपुराव्यानंतर या योजना क्लस्टरमधून वगळण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे हजारो गरीब कुटुंबांचा हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे शहरात गेल्या काही वर्षांपासून झोपडपट्टी पुनर्विकास योजनांची प्रक्रिया सुरू होती. अनेक योजना अंतिम टप्प्यात होत्या. शेकडो कुटुंबे भाड्याच्या घरात राहत होती. अशावेळी राज्यात जनहिताची क्लस्टर योजना सुरू करण्यात आली. ठाण्यात क्लस्टरचे ४४ आराखडे तयार करण्यात आले. यातील किसननगर क्लस्टरचे काम सुरू झाले असले तरी इतर ठिकाणी अद्याप काम सुरू झालेले नाही. या योजनेत एस आर ए योजना सुरू असलेल्या झोपडपट्ट्यांचा देखील समावेश करण्यात आल्याने क्लस्टरसह या झोपडपट्ट्यांचा विकासही रखडला. एसआरए योजना ठप्प झाल्याने हजारो कुटुंबे हवालदिल झाली होती.
एस आर ए योजना सुरू असलेल्या ठाण्यातील अशा नियोजित १८ सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी एसआरए प्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा, अधिवेशनात चर्चा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा असा चौफेर पाठपुरावा केला. अखेर या प्रयत्नांना यश आले असून बुधवारी राज्य शासनाने अध्यादेश काढून सन २०२२ पर्यंत सुरू असलेल्या एसआरए योजनांना क्लस्टरमधून वगळण्यात आले.
या निर्णयाबाबत आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. तसेच पुढील काळात सन २०२२ नंतर सुरू झालेल्या उर्वरित काही योजनांनाही वगळण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नव साई चैतन्य-बी केबिन नौपाडा, महाराष्ट्र दर्शन-शेलारपाडा, विष्णू-मंजुळा ठाणेकर, पवनपुत्र-सिद्धार्थ नगर कोपरी, दत्तकृपा-कोपरी कॉलनी, श्री जय अंबे -करवालो नगर, शिव औदुंबर-लोकमान्य नगर, फर्नांडिस हाऊस-धोबी आळी, साई दर्शन-नुरीबाबा दर्गा मार्ग, सिद्धी विनायक-वीर सावरकर नगर, श्री स्वामी एकता रहिवासी-चराई, मार्क्स नगर-राबोडी आदी १६ ठिकाणी एसआरए योजनांची प्रक्रिया सुरू होती.