मीरा रोड : हायपोथायरॉईडीझम असलेल्या १६० किलो वजनाच्या ३३ वर्षीय सिमोरा डिसुझा हिने लग्नाच्या १४ वर्षांनंतर ३.२ किलो वजनाच्या निरोगी बाळाला जन्म दिला. स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ. मंगला पाटील आणि त्यांचा टीमच्या सिझेरियन करून यशस्वीरीत्या तिची प्रसूती केली.
सिमोरा ही आंतरराष्ट्रीय बीपीओमध्ये काम करते. तिला लहानपणापासूनच मासिक पाळीतील अनियमितता आणि लठ्ठपणा तसेच हायपोथायरॉईडीझम असा तिचा वैद्यकीय इतिहास होता. काही वर्षांपूर्वी तिचे वजन १८५ किलो झाले. परिणामी तिला गर्भधारणा होऊ शकली नाही. त्यासाठी तिच्यावर बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे तिचे वजन १३० किलोपर्यंत कमी झाले. दरम्यानच्या काळात तिला गर्भधारणा झाली. उच्च जोखमीच्या गर्भधारणेमुळे रुग्णाला योग्य आहार आणि व्यायामाबरोबरच वारंवार फॉलोअप आणि नियमित अल्ट्रासोनोग्राफीची आवश्यकता भासते. साधारणपणे गरोदरपणात सरासरी वजन ११ किलो वजन वाढते, मात्र या प्रकरणात ते ३० किलोपर्यंत वाढले होते. आई आणि बाळ दोघांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेत शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.
लठ्ठपणा आणि इतर कोमॉर्बिडीटीज असल्याने या महिलेची गर्भधारणा धोक्याची होती. गर्भधारणेतील लठ्ठ महिलांना मुदतपूर्व प्रसूती, गर्भपात, गर्भधारणेत अडचणी, गर्भधारणेदरम्यान मधुमेह, उच्च रक्तदाब, आकुंचन आणि कमी वजनाचे बाळ यांसारख्या आव्हानांना आणि गुंतागुंतीस सामोरे जावे लागते. - डॉ. मंगला पाटील
सर्वच आशा सोडल्या होत्यालठ्ठपणा आणि थायरॉइडच्या समस्यांशी संघर्ष करत असलेल्या लग्नाच्या १४ वर्षांनंतर मी जवळ जवळ सर्वच आशा सोडल्या होत्या. बाळाला पहिल्यांदा हातात धरल्यावर मला खूप आनंद झाला. मला आणि माझ्या बाळाला नवीन जीवन दिल्याबद्दल सर्व डॉक्टरांचे सदैव आभारी राहीन, अशी प्रतिक्रिया सिमोरा डिसुझा यांनी व्यक्त केली.