कुमार बडदेमुंब्रा : येथील ४० टक्के खाजगी शाळांनी सुरू असलेल्या शैक्षणिक वर्षाची तीन महिन्यांची संपूर्ण फी माफ करण्याचा तसेच प्रयोगशाळा, टर्म फी, सांस्कृतिक कार्यक्रमांचे पैसे न घेण्याची घोषणा केली आहे. यामुळे या शाळांमधून सध्या आॅनलाइन पद्धतीने ज्ञानार्जन करीत असलेल्या तब्बल १६ हजार विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुळे अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक जणांवर बेकारीची कुºहाड कोसळली असून काहींच्या पगारात कपात झाली आहे. यामुळे इतकी वर्षे पाल्यांची नियमित फी भरत असलेले पालक यावर्षीची फी भरू शकत नाहीत. यामुळे फी आकारणीवरून अनेक शाळा आणि पालकांमध्ये वादविवाद सुरू आहेत. हा तिढा सामोपचाराने सुटावा, यासाठी अलीकडेच इत्तेहाद आणि सुलताना वेल्फेअर ट्रस्ट या सामाजिक संस्थांनी शाळा संस्थापक, शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी, शिक्षण विभागातील अधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीत उपस्थित असलेल्या शाळा व्यवस्थापकांनी सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून फी माफीबाबत निर्णय जाहीर करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शनिवारी संध्याकाळपर्यंत येथील ७८ पैकी २७ खाजगी शाळांच्या व्यवस्थापकांनी लॉकडाऊनदरम्यानची तीन महिन्यांची संपूर्ण फी माफ करण्याचे तसेच इतर अॅक्टिव्हिटीजचे पैसे विद्यार्थ्यांकडून घेणार नसल्याचे आश्वासन दिले. फीमाफीच्या या दिलाशाने सध्या कोरोनाच्या संकटात आर्थिक गणिते जुळवताना चाचपडणाऱ्या पालकांना मोठा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर फी बाबत शाळा व्यवस्थापकांना करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ज्या शाळांनी फी माफ करण्याचे आश्वासन दिले आहे, त्या शाळांप्रमाणेच उर्वरित शाळांनीही फी माफीचा निर्णय घेऊन विद्यार्थी आणि पालकांना दिलासा द्यावा.- शमिम खान, अध्यक्ष, इत्तेहाद वेल्फेअर ट्रस्ट