कल्याण : माघ शुद्ध पौर्णिमेला हजारो शिवसैनिक दरवर्षी मलंगगडावर जाऊन मलंगबाबांच्या समाधीचे दर्शन घेतात. ठाणे जिल्ह्यासह इतर ठिकाणांहून मोठ्या संख्येने शिवसैनिक येथे येतात. कल्याण शहरापासून ११ किलोमीटरवर असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर भाविकांना जाणे सोयीस्कर व्हावे, म्हणून केडीएमटी उपक्रमाकडून शनिवारी विशेष बस या मार्गावर सोडल्या जाणार आहेत.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने १९८२ पासून शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली मलंगमुक्तीचे आंदोलन सुरू झाले. गेली ३७ वर्षे ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. मलंगगडावरील मच्छिंद्रनाथांची समाधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. याच ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी अमरनाथांना दीक्षा दिल्याची आख्यायिका आहे. तर, मुस्लिम समाजाने हे स्थान हाजीमलंग असल्याचा दावा केला आहे. हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
शनिवारी माघ पौर्णिमेनिमित्त हजारोंच्या संख्येने शिवसैनिक तसेच भाविक मलंगगडाकडे कूच करणार आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी केडीएमटीच्या बस या मार्गावरून दिवसभर धावणार आहेत. शनिवारी पहाटे ४.३० वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत ही सेवा चालविली जाईल. त्यासाठी उपक्रमाच्या १७ बस ठेवल्याची माहिती केडीएमटीचे सभापती मनोज चौधरी यांनी दिली. मलंगगड यात्रेच्या पूर्ण आठवड्यासाठी केडीएमटीच्या बस चालविल्या जातात, परंतु शनिवारी जादा बस चालविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व बस कल्याण रेल्वेस्थानक परिसरातून सुटणार आहेत.