भिवंडी : तालुक्यातील खांबाळे परिसरातील शिरगाव येथे वीटभट्टी मजुरांच्या झोपड्या जळून खाक झाल्याची घटना शनिवारी घडली आहे .विशेष म्हणजे दुर्घटनेच्या २४ तासानंतर ही घटना समोर आली आहे.त्या नंतर पोलीस व महसूल यंत्रणेची धावाधाव सुरू झाली असून, वीटभट्टी मालका विरोधात कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
भिवंडी तालुक्यातील शिरगाव येथे अरविंद प्रजापती यांचा परंपरागत वीटभट्टी व्यवसाय असून तेथे शनिवारी दुपारी विटा बनविण्याचे मातीकाम सुरू असताना अचानक लाकडी काटक्या गवता पासून बनविलेल्या झोपड्यांना आग लागली व पाहता पाहता ती सर्वत्र पसरत तेथील एकूण १७ झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत झोपड्यात मजूर कुटुंबीयांनी साठविलेले धान्य, कपडे,पांघरूण हे जळून नुकसान झाले आहे. सुदैवाने तेथील लहान बालके बाहेर खेळत असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटने नंतर मजुरांनीच ही आग पाणी मारून विझवली.परंतु या दुर्घटनेची माहिती वीटभट्टी मालक अरविंद प्रजापती यांनी पोलीस व महसूल प्रशासना न कळविता दुर्घटने वर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला असता रविवारी या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी कार्यकर्त्यांना काळविल्या नंतर ही घटना प्रकाशात आली आहे .त्यानंतर मंडळ अधिकारी संतोष आगीवले यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे .तर तातडीची मदत म्हणून स्वयंसेवी संस्थां कडून धान्य कपडे पांघरूण उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती पडघा मंडळ अधिकारी संतोष आगीवले यांनी दिली आहे.