ठाणे : भिशीतील १५ लाख ८६ हजारांचे हप्ते भरूनही १७ लाख ८० हजारांची फसवणूक करणाऱ्या फरिदा शेख, मुलगी कैसर सय्यद आणि जावई रौफ सय्यद या तिघांविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात मोहिद्दीन शेख या चालकाने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चौकशी सुरूअसल्यामुळे संशयित आरोपींना नोटीस बजावल्याचे राबोडी पोलिसांनी सांगितले.ठाणे पश्चिम भागातील के व्हिला येथील संजिदा इमारतीमध्ये राहणारी फरिदा शेख ही त्याच परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीरपणे बोलीभिशी चालवते. तिच्याकडे मोहिद्दीन शेख यांच्यासह अनेकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. शेख यांनी १० लाखांची भिशी काढली असून त्यासाठी त्यांनी आजपर्यंत १५ लाख ८६ हजारांचे हप्ते भरले आहेत. याआधीच्या १५ लाखांच्या भिशीतील उर्वरित एक लाख ४६ हजार ३२० रुपयांची रक्कम अशी १७ लाख ८० हजारांची रक्कम तिने त्यांना दिली नाही. उलट, त्यांची आधीपासूनच भाड्याने दिलेली खोली शेख यांनी ११ महिन्यांच्या भाडेकरारावर देण्याचा करारनामा केला. ही खोलीदेखील शेख यांच्या ताब्यात दिली नाही. वारंवार या पैशांची मागणी करूनही फरिदा, तिची मुलगी कैसर आणि तिचा पती रौफ यांनी ही रक्कम न दिल्याने अखेर याप्रकरणी त्यांनी २५ मे रोजी त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक हुंबे हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
भिशीतील १७ लाख ८० हजारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 1:08 AM