ठाणे : आम्ही नार्काेटिक्स विभागातील पाेलिस असल्याची बतावणी करीत तैवान देशात पाठविलेल्या कुरिअरमध्ये एमडी ड्रग्ज सापडल्याचा दावा करीत काही सायबर भामट्यांनी ३१ वर्षीय महिलेला १७ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार नुकताच घडला.
ठाण्याच्या ढाेकाळी भागात राहणाऱ्या तक्रारदार महिलेला ६ सप्टेंबर २०२४ राेजी अनोळखी महिलेने माेबाईलवरून काॅल केला. या काॅलद्वारे तिला तुम्ही तैवान देशात पाठविलेल्या कुरिअरमध्ये एमडी आणि एमए ड्रग्ज सापडल्याचा दावा केला. तुमच्या विराेधात नार्कोटिक्स विभागात पोलिस तक्रार झाल्याचे तिला सांगण्यात आले. त्यानंतर अन्य एकाने नार्काेटिक्स डिपार्टमेंटमधून पाेलिस बाेलत असल्याचा दावा करीत व्हेरिफिकेशनसाठी स्काईप हे ॲप डाउनलोड करण्यास या महिलेला सांगितले.
कर्ज घेण्यास भाग पाडलेकायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी तक्रारदार महिलेला आयसीआयसीआय बँक खात्यातून १७ लाखांचे कर्ज घेण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने १५ ऑक्टाेबर २०२४ रोजी तक्रार दिली आहे.
परदेशात पाठविलेल्या कुरिअरमध्ये अंमली पदार्थ तसेच इतर आक्षेपार्ह सामान मिळाल्याने पोलिस केस झाली आहे. याबाबत फोन आल्यास त्यावर विश्वास ठेवू नका. तसेच बँक डिटेल आणि इतर खाजगी माहिती अनोळखी व्यक्तीला शेअर करू नये. अनोळखी कॉल, व्हिडीओ कॉल रिसिव्ह करू नका. त्याचबराेबर कोणत्याही वेबसाईट तसेच ॲप लिंक क्लिक करू नये. - शैलेश साळवी, वरिष्ठ पाेलिस निरीक्षक, जनसंपर्क अधिकारी ठाणे