लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : किरकोळ वादातून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना कल्याण पूर्वेत रविवारी रात्री ११ वाजता घडली होती. या घटनेप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी करण्यात आलेल्या तक्रारींवरून एकूण १७ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
पूर्वेतील कपड्याचे दुकान चालविणारे संतोष प्रजापती आणि विजय दुबे हे रात्री दुकान बंद करून मलंग रोडवरील काका ढाबा परिसरातील पानटपरीवर पान खाण्यासाठी गेले होते. तेथे दोघांचा काही तरुणांशी वाद झाला. या वादाचे पर्यावसान दोन गटांतील हाणामारीत झाले. यात जखमी झालेल्या प्रजापती आणि दुबे यांच्यावर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या हाणामारीप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दुबेंच्या तक्रारीवरून प्रीताशू सिंग, रॉनी थेरोड, अन्नू डोंगरे, हुसेन शेख व इतर आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पानटपरीच्या ठिकाणी दोघांचा प्रीताशू सिंग याच्याशी वाद झाला. प्रीताशू शिवीगाळ करून निघून गेला. परंतु, त्यानंतर तेथे प्रीताशू पुन्हा आला आणि त्याने तसेच रॉनी, अन्नु, हुसेन व इतर साथीदारांनी दांडके, रॉड आणि शस्त्राने हल्ला केल्याची तक्रार दुबेंनी केली आहे.
लोखंडी झारा, चाकूने हल्ला
रॉनी थेरोड यानेही तक्रार दाखल केली आहे. दुबे याने सिगारेट मागितली असता मी त्याला सिगारेट नाही, असे सांगितल्याचा राग आल्याने दुबेने दमदाटी केली. तर, त्याच्या सहकाऱ्यांसह शेंगदाणे विक्रेत्याच्या हातगाडीवरील लोखंडी झाऱ्याने आणि चाकूने माझ्यासह मित्रांवर प्राणघातक हल्ला केल्याचे रॉनी याने तक्रारीत म्हटले आहे. त्याच्या तक्रारीवरून विजय दुबे, संतोष प्रजापती आणि दिलीपकुमार सावरया आदींवर गुन्हा दाखल झाला आहे.
------------------------------------------------------