मीरा रोड : ताप येतो म्हणून मीरा- भार्इंदर महापालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या १७ वर्षीय मुलीचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. यामुळे वातावरण तंग झाल्याने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. उपचारासाठी डॉक्टरच नसल्याने पालिकेच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांसह नातेवाईकांनी केला आहे. त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.आंबेडकर नगरातील वैशाली दगडु डुमरे (१७) बारावीत मालेगावच्या कॉलेजमध्ये शिकते. सुट्टीनिमित्त ती घरी आली होती. ताप आल्याने आई - वडिलांनी सोमवारी सकाळी उपचारासाठी जोशी रूग्णालयात नेले. तपासणीनंतर तिला रूग्णालयात दाखल केले. पण असह्य वेदना सुरु होऊन नाक व घशातून रक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर रूग्णालयाने चिठ्ठी देऊन तिला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात स्थलांतर करण्यास सांगितले. तिच्या प्लेटलेट घटल्याने जवळच्याच खाजगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी ती मरण पावल्याचे सांगितल्याने तिला पुन्हा जोशी रुग्णालयात आणले. हे परिसरातील रहिवासी, नातलगांना कळताच त्यांनी रूग्णालयात धाव घेतली. नयना म्हात्रे, वर्षा भानुशाली, डॉ. सुशील अग्रवाल, जयेश भोईर आदी नगरसेवक तेथे गेले. पालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव यांच्यासह अन्य डॉक्टरही रुग्णालयात दाखल झाले.तणाव वाढू लागल्याने पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. डॉक्टरने तपासणी न करता परिचारिकेनेच उपचार केल्याने आणि वेदना होत असतानाही दुर्लक्ष केल्यानेच वैशालीचा मृत्यू झाल्याची तक्रार वडिलांनी केली. रुग्णालयाने भार्इंदर पोलिसांना फ्लू हे मृत्यूचे कारण कळवले. पण नंतर नातलगांनी टेंबा येथे शवविच्छेदन करण्यास नकार देत जे.जे. रूग्णालयात मृतदेह पाठवला. उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी रात्री आयुक्त डॉ. नरेश गीते यांना फोन करून सदोष मनुुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.वैशालीवर उपचार करण्यासह तिला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. पालाकांच्या भावना आम्ही समजू शकतो.- डॉ. प्रकाश जाधव, प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी.रूग्णालय सुरु केले हे केवळ नागरिकांची दिशाभूल करण्यापुरतेच आहे. येथे आजही कायम चांगले डॉक्टर व अत्यावश्यक उपचार आणि सुविधा नसल्याने वैशालीचा बळी गेला आहे. या आधीही असे प्रकार घडले आहेत.- रोहित सुवर्णा, माजी नगरसेवक.
योग्य उपचाराअभावी १७ वर्षाच्या मुलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 6:41 AM