अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार आता महिनाभरानंतर मिळालेल्या आकडेवारीनुसार, दिवसाला मध्य रेल्वेच्या हार्बर, मुख्य आणि ट्रान्स हार्बर या तिन्ही मार्गांवर सहा लाख प्रवासी वाढले आहेत. सध्या २१ लाख प्रवासी प्रवास करीत असल्याची उघडकीस आली आहे. सध्या दिवसाला सरासरी १७ हजार नागरिक पास काढत आहेत.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्टपर्यंत या तिन्ही मार्गांवरून सुमारे १५ लाख प्रवासी प्रवास करीत होते. कोविड आधी २०१९ मध्ये सुमारे ४५ लाख प्रवासी प्रतिदिन प्रवास करीत होते. त्यात अत्यावश्यक सेवा, बँका यांसह महापालिका, रेल्वे आदी सेवेतील प्रवासी प्रवास करीत होते. त्यानंतर सामान्य प्रवाशांना रेल्वेने जाता यावे यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर टास्क फोर्सशी चर्चा करून राज्य शासनाने दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण केलेल्यांना प्रवास करता येईल, पण त्यासाठी त्यांच्या कोविड लस प्रमाणपत्राची क्यूआर कोड पाहणी करण्यासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थाना सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, केडीएमसी हद्दीत गेल्या महिन्यात लोकल सेवा सुरू झाल्यावर सुमारे दीड लाख नागरिकांनी दोन डोस घेतल्याचे स्पष्ट झाले होते. बुधवारच्या महितीनुसार, त्यात एक लाखाची भर पडली असून, आजमितीस येथील दोन लाख ६८ हजार नागरिकांना ते डोस मिळाले आहेत. या आकडेवारीनुसार, यापैकी ५० हजार नागरिकांना आता प्रवासाची मुभा मिळणार आहे.
-----------
आतापर्यंत झालेले पासचे वितरण
१५ ऑगस्टपासून आतापर्यंत सहा लाख १३ हजार ७०८ प्रवाशांनी पास काढला असून, त्यात १६ ऑगस्टला सर्वाधिक २७ हजार १२४, २३ ऑगस्ट आणि १४ सप्टेंबरला २५ हजार ८५८ पास वितरित करण्यात आले. तर, २९ ऑगस्टला अवघे आठ हजार पास काढण्यात आल्याची नोंद रेल्वे सूत्रांनी दिली.
----------