ठाणे : घरगुती वाद विकोपाला जाऊन घटस्फोट घेणा-या खटल्यांसह पोटगी व मुलामुलींच्या ताब्यासाठी जिल्हाभरातून मोठ्याप्रमाणात हे खटले दाखल होत आहेत. या आर्थिक वर्षाच्या अवघ्या दहा महिन्यात असे एक हजार ३२ खटले दाखल झाले आहेत. हे प्रमाण चिंताजनक असल्याचे येथील कौटुंबिक न्यायालयाचे रजिस्टार बी. बी. बागल यांनी लोकमतला सांगितले.
घटस्फोटाची एकतर्फी व दोघांच्या संमतीने घटस्फोट या प्रकारापैकी संसारातील वितुष्टामुळे तो घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. संपत्तीचे खटले अल्पप्रमाणात दाखल झाले आहेत. याप्रमाणेच मुलांचा ताबा, पोटगीची मागणी, हुंड्यासाठी छळ, वेगळे राहण्यासाठीचा वाद, चारित्र्यावरील संशय आदी विविध कारणाखाली ठाणे कौटुंबिक न्यायालयात हे खटले दाखल होतात. वर्ष संपण्यास दोन महिन्यांचा अवधी आहे. या काळात खटले वाढण्याची शक्यता बागल यांनी व्यक्त केली.
संपत्तीचे खटले निकाली काढण्याचे प्रमाण निम्मेपेक्षा जास्त आहे. मात्र एकतर्फी खटले निकाली काढण्यास विलंब लागत आहे. मुलांचा ताबा देण्याचे खटलेदेखील कमी प्रमाणात निकाली निघत आहेत. पोटगी व घरातील वादविवादातून होणारे घटस्फोट मोठ्याप्रमाणात निकाली निघत असल्याचे बागल यांनी सांगितले. शक्यतोवर ते होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातून बरेच परिवार एकत्र आणणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. घाणेकर नाट्यगृहात १२ आॅक्टोबरला खास प्रशिक्षण कार्यक्रम महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.