डोंबिवली : विधानसभा निवडणूक आयोगाची आचारसंहिता लागताच शनिवारी डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघ परिसरातील १७६ राजकीय, सामाजिक संस्थांचे बॅनर, होर्डिंग, पोस्टर आणि झेंडे काढण्यात आले. त्यामुळे शहराने मोकळा श्वास घेतल्याचे पाहायला मिळाले.शहरातील अधिकृत बॅनर व कमानीवगळता अन्य बॅनर, होर्डिंग, पोस्टरवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे प्रभाग अधिकारी व कर्मचारी जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले. पश्चिमेतील ‘ह’ प्रभागात ७२, ‘ग’ प्रभागात ५० तर ‘फ’ प्रभागात ५४ बॅनर, पोस्टरवर, झेंडे, कमानींवर कारवाई करण्यात आली. त्यात राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, नेत्यांच्या भूमिपूजनांचे बॅनर, सामाजिक संस्थांचे शुभेच्छा संदेश देणारे बॅनर, नेत्यांच्या दौऱ्यांचे छोटे फलकही हटवण्यात आले.केडीएमसीचे ‘ग’ प्रभागक्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप म्हणाले की, दुपारपासून कारवाई सुरू असून रात्री उशिरापर्यंत ते काम सुरू राहणार आहे. आचारसंहितेच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. रेल्वेस्थानक परिसर, लहानमोठे रस्ते, गल्ल्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे पथक पाठवण्यात आले होते. शहरात लावलेल्या बॅनरची माहिती दोन दिवसांपासून घेण्यात आली होती.‘फ’ प्रभागक्षेत्र अधिकारी दीपक शिंदे म्हणाले की, प्रभागातही पथक कार्यरत असून वाहनांमध्ये फलक टाकण्यात येत आहेत. त्यामुळे बॅनर काढले की, रस्त्यावर न टाकता ते लगेचच जमा करण्याचे आदेश कर्मचाºयांना दिले आहेत. तसेच जमतील तेवढ्या नोंदी ठेवण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. ‘ह’ प्रभागक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे म्हणाले की, अनंत चतुर्दशीनंतर लगेचच कारवाई सुरू केल्याने शनिवारी फारसा ताण पडला नाही. परंतु, तरीही ६९ ठिकाणी कारवाई केली.निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी कोणत्याही प्रकारे आचारसंहिता भंग करणारे कृत्य करू नये. ठिकठिकाणी त्यांनी लावलेले बॅनर, पोस्टर, झेंडे, होर्डिंग तातडीने काढावेत. अन्यथा, नियमांनुसार काही तासांनंतर निवडणूक विभागाचे पथक पाहणी दौरे करून कारवाई करेल.- गजेंद्र पाटोळे, सहायक निवडणूक अधिकारी, डोंबिवली मतदारसंघ
१७६ बॅनर, झेंड्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:50 PM