ठाणे महानगपालिकेच्या हद्दीत असलेल्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर रुग्णालयातील कारभार आणि आरोग्य व्यवस्थेच्या दुरवस्थेबाबत संताप व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कळव्यामधील या रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात आल्यावर रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच परिस्थितीचा आढावा घेऊन रुग्णालयात झालेले १८ मृत्यू नक्की का झाले आणि कोणत्या परिस्थितीत झाले. याची माहिती जाणून घेतली. तसेच कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर आदी अधिकारी उपस्थित आहेत.