ठाणे : कल्याण फाटा ते खिडकाळी या रस्त्याच्या कामामुळे भूमिगत विद्युत केबल वाहिनी तुटल्याने शनिवारी सकाळी दहा वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी रविवारी पहाट उजाडली. त्यामुळे जवळपास १८ तास दिव्यातील काही भागांची बत्तीगुल झाली होती. पंधरा दिवसांतील अशा प्रकारची ही दुसरी घटना असून, विद्युत वाहिनी तोडल्याने महावितरण अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. दरम्यान, एकीक डे लोडशेडिंगची टांगती तलवार दिव्यातील नागरिकांवर असताना, मागील पंधरा दिवसांत दोन वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैैराण झाले आहेत.गेल्या काही दिवसांपासून दिव्यात सकाळी साडेचार तास आणि सायंकाळी अडीच तास असे दिवसातून सात तासांचे लोडशेडिंग करण्यात येत आहे. त्यातच शनिवारी सकाळी दहा वाजता अचानक वीजपुरवठा खंडित झाला. लोडशेडिंगमुळे वीजपुरवठा खंडित झालेला असावा, असे प्रारंभी नागरिकांनी गृहीत धरले. मात्र, सायंकाळची रात्र झाली तरी वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिक हैैराण झाले.दरम्यान, कल्याणफाटा ते खिडकाळी येथे एमएसआरडीसीमार्फत रस्त्याचे काम सुरू आहे. त्या कामासाठी वापरण्यात येणाºया जेसीबीमुळे भूमिगत विद्युत वाहिनी तुटल्याचे समोर आले. तुटलेल्या केबलचे काम पूर्ण होईपर्यंत रविवारी पहाटेचे चार वाजले. त्यामुळे सायंकाळचे अडीच तासांचे लोडशेडिंग रद्द करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.मागील पंधरा दिवसांत एमएसआरडीसीमार्फत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे दोन वेळा विद्युत केबल वाहिनी तोडण्यात आली आहे. केबल वाहिनी तोडल्याप्रकरणी शनिवारी शीळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे महावितरण अधिकाºयांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. ती दखलपात्र गुन्ह्यामध्ये वळती करून घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र अशा घटनांमध्ये दखलपात्र गुन्हा दाखल होत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.लोडशेडिंगबाबत दिव्यातील नागरिकांनी वारंवार तक्रारी देऊनही दुर्लक्ष केले जाते. दिव्यातून जेवढी वसुली केली जाते, तेवढ्या प्रमाणात सुविधा मिळत नाही. दिव्यात वीजचोरीचे प्रमाण प्रचंड आहे. ते रोखण्यात महावितरणला यश आले तर, लोडशेडिंगची गरजच भासणार नाही, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते रोहिदास मुंढे यांनी दिली.>या भागात होता अंधारदिव्यातील गणेशनगर, मुंब्रा कॉलनी, विकास म्हात्रे गेट, धर्मवीरनगर, वक्रतुंडनगर, सिद्धिविनायक नगर, सुदाम रिजेन्सी आणि खर्डीपासून शीळ गाव आदी भागात जवळपास १८ तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे रविवारी सायंकाळी केले जाणारे अडीच तासांचे लोडशेडिंग रद्द करण्यात आले.
‘दिव्या’ची १८ तास ‘बत्ती गुल’, महावितरणची पोलिसांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 12:21 AM