धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: भाईंदरच्या उत्तन पातान बंदर येथील गॉडवील या मच्छीमार बोटीचा पंखा समुद्रात तुटून पडल्याने बोट भरवादळात समुद्रात बंद पडली आहे. बोटीवर नाखवा व १७ खलाशी असे १८ जण अडकले असून त्यांना मदतीसाठी कोस्टगार्ड , पोलीस, मत्स्य विभाग सह मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना मच्छीमार संस्थेने कळवले आहे.
भाईंदरच्या उत्तन पातान बंदर येथील गॉडवील ह्या मच्छीमार बोटीचे नाखवा अलेकझांडर डग्लस बेळू व इतर १७ जण हे मासेमारीसाठी खोल समुद्रात गेले होते. परंतु गेल्या दोन दिवसां पासून मुसळधार पाऊस व वादळीवारे सुरु झाल्याने मच्छीमार बोटींना किनाऱ्यावर परतण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने मासेमारीसाठी गेलेल्या बोटी परतू लागल्या आहेत.
अलेक्झांडर हे देखील किनाऱ्यावर परतण्यासाठी निघाले होते. परंतु त्यांचा बोटीचा पंखा अर्थात प्रोपेलर तुटून पाण्यात पडल्याने बोट चालू शकत नाही. बोट समुद्रात हेलकावे खात असून त्यावरील सर्व १८ जण अडकून पडले आहेत. सदर बोट भर समुद्रात बंद पडून १८ जण अडकल्याची माहिती रविवारी सकाळी ७ च्या सुमारास वायरलेस वरून मिळाल्यावर मदतीसाठी कोस्टगार्ड, पोलीस, मत्स्य विभागासह मासेमारीसाठी गेलेल्या बोटींच्या नाखवा यांना कळवले आहे, असे मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी सांगितले.
कोस्ट गार्ड कडून मदत पाठवतो असे आश्वासन मिळाले आहे. बंद पडलेल्या बोटीशी वायरलेसद्वारे संपर्क होत असला तरी हवामान ठीक नसल्याने व्यत्यय येत आहे असे ते म्हणाले.