मुरबाड : दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागू नये, यासाठी मुरबाड तालुक्यात तब्बल १८० पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या. यासाठी करोडो रुपये खर्चही झाले. मात्र, तरीही येथील १८ गावांमध्ये पाण्याची समस्या भेडसावतेच आहे. दरम्यान, या टंचाईग्रस्त भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत समितीने तीन टँकर सुरू केले असून यातून नऊ गावे आणि ३३ वाड्यापाड्यांना पुरवठा होतो आहे.शासनाने राबवलेल्या १८० पैकी किमान १० योजनादेखील कार्यान्वित न झाल्याने तालुक्यातील तुळई, तळेखल, देहरी, देशमुखपाडा, वेहरे, माजगाव, धारगाव, आगाशी, सासणे, तोंडली, म्हाडस, उचले, साकुर्ली, बाटलीचीवाडी, वाघाचीवाडी, गेटाचीवाडी, पाटगाव, मोहघर, गुमाळवाडी आणि शिळंद अशा १८ गावांत ३३ वाड्यापाड्यांत डिसेंबरपासूनच पाणीप्रश्न बिकट झाला आहे. पाटगाव परिसरात वर्षानुवर्षे भेडसावणारी पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टकडून आर्थिक मदत करण्यात आली होती. मात्र, तरीही येथील समस्या सुटत नसल्याने आदिवासींमध्ये संताप आहे. यावर उपाय म्हणून भूगर्भातील पाणी वर आणण्यासाठी सुमारे २०० फूट बोअरवेल गावागावांत खोदल्या. परंतु, भूगर्भातील पाण्याची पातळीदेखील घसरल्याने शासनाने २०० फूट खोल खोदलेल्या बोअरवेल कुचकामी ठरल्या आहेत. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. (वार्ताहर)
मुरबाड तालुक्यातील १८ गावे तहानलेलीच, टँकरने पाणीपुरवठा
By admin | Published: April 26, 2017 11:53 PM