ठाणे : ठाणे जिल्हा प्रशासन गेल्या सात दिवसांपासून 'महसूल सप्ताह' साजरा करीत आहे. विविध कार्यक्रम आणि उपक्रमाखाली पार पडलेल्या या सप्ताहची आज अनोख्या पद्धतीने सांगता झाली. त्यानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात १७ तरुणांना तलाठी पदावर व एकाला शिपाईपदी नियुक्त करुन घेण्यात आले. अनुकंपा तत्वावर या आठ तरुणांना जिल्हा प्रशासनाने नोकरी दिली आहे.
येथील जिल्हा नियोजन भवनात हा महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ विविध कार्यक्रमांनी रंगला. तरुणांच्या या नियुक्ती पत्रासह महसूल सप्ताहात उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. या सप्ताह कालावधीमध्ये विविध दाखले वाटप, युवा संवाद अंतर्गत युवकांपर्यंत महसूलच्या सेवा पोहोचविणे, नागरिकांना विविध प्रमाणपत्रे व सेवा देण्यासाठी जनसंवाद कार्यक्रम, माजी सैनिकांसाठी सैनिकहो तुमच्यासाठी, माजी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी संवाद कार्यक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्यातील विविध तालुक्यात पार पडले.
आजच्या या सप्ताहाची सांगता अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांच्या अध्यक्षतेखाली दिमाखात पार पडली. यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, राजू थोटे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, तहसिलदार युवराज बांगर, अधिक पाटील, राहुल सारंग, प्रशांती माने, संजय भोसले, नीलिमा सूर्यवंशी, अपर नायब तहसिलदार अभय गायकवाड हे उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातून बदली झालेले जिल्हा पुरवठा अधिकारी राजू थोटे, नायब तहसिलदार मृणाल कदम, राजश्री पेडणेकर यांना निरोप देण्यात आला. तर जिल्ह्यात नवीन नियुक्त झालेले जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, तहसिलदार नीलिमा सूर्यवंशी, तहसिलदार संजय भोसले, राहुल सूर्यवंशी यांचे स्वागत करण्यात आले.