कल्याण : पश्चिमेकडील टिळक चौक परिसरातील दत्तआळीतील १८० वर्षे जुना वटवृक्ष रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास उन्मळून पडला. या घटनेमुळे अनेक पिढ्यांचा साक्षीदार इतिहासजमा झाल्याची खंत स्थानिक रहिवाशांसह पर्यावरणप्रेमी आणि इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. योगायोग म्हणजे हा महाकाय वटवृक्ष उन्मळून पडताना अवतीभवती उभ्या असलेल्या इमारतींवर न पडता परिसरातील दत्त मंदिराच्या बाजूला असलेल्या पुजाऱ्याच्या घरावर पडल्याने त्याच्या घराचे नुकसान झाले. जर हा महाकाय वटवृक्ष शेजारील इमारतींवर पडला असता तर कदाचित मोठी जीवितहानी झाली असती.
ऊनपावसात अनेक वर्षे हजारो लोकांना सावली देणाºया वटवृक्षाने पडतानाही अनेकांच्या जीविताचे रक्षण केल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, पुन्हा एकदा याच वृक्षाचं रोपण करण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतला असून त्यासाठी तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले आहे. कल्याण शहराला ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे शहरातील अनेक ऐतिहासिक वास्तूंप्रमाणे या वटवृक्षालादेखील हेरिटेजचा दर्जा असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. पूर्वी वाड्यांच्या असलेल्या या परिसरात इमारती उभ्या राहिल्या आहेत. वटवृक्षाच्या बाजूला दत्त मंदिर आहे. ते त्याहूनही जुने आहे. यात दत्ताच्या मूर्तीसह स्वामी समर्थ आणि हनुमानाच्या तसबिरी आहेत. मंदिरातील कीर्तन वटवृक्षाच्या पारावर चालत असे, एवढेच नव्हे तर दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजºया होणाºया दत्तजयंती उत्सवासह गोकुळाष्टमी सणाचा हा वटवृक्ष साक्षीदार होता. याच भागात पूर्वी पिंपळही होता. वड आणि पिंपळ असे एकत्रित असलेले ते एकमेव ठिकाण होते. मात्र, आता वडदेखील राहिला नसल्याची खंत व्यक्त होत आहे. वटवृक्ष कोसळला असला तरी त्याचे पुन्हा रोपण करण्याचा निर्णय घेतल्याचे स्थानिक रहिवासी समीर लिमये यांनी सांगितले. यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाणार असल्याचे ते म्हणाले. वटवृक्ष कोसळल्याने येथील विद्युतवाहिन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, रविवारी संध्याकाळपासून या परिसरात वीजपुरवठा खंडित झाला आहे. तो सोमवार दुपारपर्यंत सुरळीत झाला नव्हता.
वीजपुरवठा नसल्याबाबत कोणत्याही रहिवाशाची तक्रार नव्हती. परंतु, वटवृक्ष उन्मळल्याची घटना त्यांच्या मनाला चटका लावून गेली.पुजाऱ्याच्या घराचे नुकसानदत्त मंदिरातील पुजारी अवधूत जोशी हे मंदिराच्या बाजूकडील घरात राहायचे, परंतु आता तेही त्याठिकाणी राहत नाहीत. त्याठिकाणी आता पूजेचे व अन्य साहित्य ठेवले जाते. ज्यावेळी वटवृक्ष मंदिराच्या दिशेने कोसळला, तेव्हा तो बाजूकडील घरावर कोसळला त्यावेळी जोशी हे मंदिरात आरती करीत होते. मंदिरावर वृक्ष न कोसळल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जोशी यांचे वडील हरिभाऊ जोशी १९४६ सालापासून या मंदिरात पूजा करायचे. दरम्यान, वडिलांनंतर आता ही जबाबदारी अवधूत सांभाळत आहेत.ऐतिहासिक वृक्षाचा झाला अंत; नागरिकांनी सांगितल्या आठवणीइतिहास अभ्यासक श्रीनिवास साठे यांनी या वटवृक्षाचा इतिहास सांगितला. ते म्हणाले की, हा वटवृक्ष किमान १६० ते १८० वर्षे जुना आहे. १८५४ मध्ये कल्याण पालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्या सदस्यांच्या यादीत उपाध्ये आणि किरकिरे होते. यातील उपाध्ये यांनीच पार बांधून वड लावला असणार, असा साठे यांचा दावा आहे. या वडाच्या झाडाखाली मुलांच्या मुंजी झालेल्या आहेत. कारण, ती प्रथा होती. त्यामुळे झाडावर समंध, भुते, मुंज्या बसत नाही. अन्यथा, हे झाड रात्री पारंब्यांमुळे भीतीदायक वाटते. लहानपणी रा.स्व. संघाच्या शाखेतून घरी एकटे येण्यास घाबरत असू. त्याचे कारण हा वटवृक्ष होता. वटवृक्ष पडल्याने दत्तआळीकर तसेच ओक बालकमंदिर शाळेतील मुलांची बसण्याची सावली गेली.कल्याणला प्राचीन गावपणाच्या ज्या मोजक्या खाणाखुणा आहेत, त्यातील एक पुसल्याचे दु:ख झाले, असे साठे म्हणाले. कदाचित, कल्याणला वारसा आणि इतिहास यांचे काही देणेघेणे नाही. तो फक्त शब्द आणि पुस्तकरूपाने ठेवण्याचा अभिमान वाटतो. मग, जर गावालाच काही पडली नाही, तर मग मीच कशाला पेव्हरब्लॉकच्या वेढ्यात श्वास कोंडून उभे राहायचे? असा विचार करत तो बिचारा वड पडला असेल, असेच म्हणावे लागते. असो. मृत्यू कोणाला टळला आहे? पण तो कोरोनाकाळात वडालाही यावा, ही दु:खदायक बाब आहे, अशा शब्दांत साठे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खंत व्यक्त केली आहे. केडीएमसीने या पाराचे पुननिर्माण करावे, ही विनंतीही त्यांनी केली आहे.