मीरा रोड : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नावाचा वापर करून प्लॅस्टिक पिशव्या विकल्या जात असल्याचे उघडकीस येऊनही पिशव्यांचा साठा पालिका अधिकाऱ्यांनी जप्त केला नव्हता. याबाबत, ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर पालिकेने १८०० किलो पिशव्यांचा साठा जप्त केला.भार्इंदर पूर्वेला रेल्वेस्थानकासमोरील मार्केटमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाव, एसएसआय व एमपीसीबी क्रमांक असलेल्या पिशव्यांची घाऊक विक्रेत्यांकडून सर्रास विक्री सुरू होती. पिशव्यांवर ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडी व पुनर्वापरयोग्य असल्याचे छापले असले, तरी त्या जेमतेम २० ते ४० मायक्रॉन जाडीच्या पिशव्या असल्याचे मंडळाच्या ठाणे विभागाच्या निरीक्षक सुवर्णा गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्यानुसार, गेल्या मंगळवारी गायकवाड यांच्यासह पालिकेचे स्वच्छता निरीक्षक, मुकादम आदींनी घाऊक विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू केली होती.कारवाई गुंडाळून ठेवावी लागलीपालिका उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे हे घटनास्थळी आले असता त्यांनी पिशव्या जप्त करू नका, असे सांगत विक्रेत्यांना आठवडाभराची मुदत देऊन त्या कंपनीला परत करा, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे प्लॅस्टिकविरोधातील कारवाई गुंडाळून हाती आलेला मोठा साठा सोडून द्यावा लागला. परंतु, अन्य काही पिशव्यांवरून विक्रेत्यांकडून ५५ हजारांचा दंड वसूल करून सुमारे २०० किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले होते. मात्र, पिशव्यांचा मोठा साठा सोडल्याप्रकरणी ‘लोकमत’मध्ये वृत्त येताच यंत्रणेची धावपळ उडाली. कारवाई करण्याची जबाबदारी पालिकेची असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. गुरुवारी पालिकेचे स्वच्छता निरीक्षक अभय सोनावणे आदी कर्मचाºयांनी येथील घाऊक विक्रेत्यांच्या दुकानातील पिशव्यांचा साठा जप्त केला. हा साठा १८०० किलो असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.
भार्इंदरमध्ये १८०० किलो प्लॅस्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 6:30 AM