ठाणे : ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा यंदा १८ आॅगस्ट रोजी आयोजिण्यात येणार आहे. ठाण्यातील मॅरेथॉनच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच पुरुष आणि महिलांची मुख्य स्पर्धा २१ किलोमीटरची होणार असून बक्षिसांच्या रकमेचा आकडा सव्वाआठ लाखांवर गेला आहे. आगामी विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून ठाणे महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी ही राजकीय खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या स्पर्धेसाठी शिवसेनेच्या काही बड्या नेतेमंडळींना बोलवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.ठामपा आणि ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा तिसावी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा राज्यपातळीवरील असल्यामुळे राज्यातून साधारणपणे १५ ते २० हजार खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. धावपटूंच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी तसेच ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून देश व जागतिक पातळीवर धावपटू निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले जाते. गेली अनेक वर्षे ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा संपूर्ण राज्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिली आहे. मान्सून सुरू झाल्यावर ठाणेकर नागरिकांना या स्पर्धेची प्रतीक्षा असते. त्यानुसार, यंदा ही स्पर्धा १८ आॅगस्ट रोजी आयोजित केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याकरिता, महापालिका मोठ्या प्रमाणात तयारीला लागली आहे. याकरिता विविध विभागांच्या बैठका सुरू आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंत या मॅरेथॉन स्पर्धेवर सत्ताधारी शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे.विधानसभा निवडणुकांच्या पाशर््वभूमीवर यंदा मोठ्या उत्साहात स्पर्धांचे आयोजन करण्याचा सत्ताधाऱ्यांचा मानस आहे. शिवसेनापक्षप्रमुखांसह युवासेना नेते या स्पर्धेसाठी येण्याची शक्यता आहे. यासाठी पालिकेतर्फे ४० लाख, तर प्रायोजकांद्वारे ३० लाख असे एकूण ७० लाख रुपये खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.गतवर्षी या स्पर्धेमध्ये सात लाखांची बक्षिसे वाटण्यात आली होती. यंदा त्यात सव्वा लाखांनी वाढ केली आहे. यंदा पहिल्यांदाच महिलांची मुख्य स्पर्धा ही १५ किलोमीटरवरून २१ किलोमीटर करण्यात येणार असल्याने, दोन्ही मुख्य स्पर्धा २१ किलोमीटरच्या होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे मॅरेथॉन स्पर्धा रंगणार १८ ऑगस्ट रोजी, बक्षिसांच्या रकमेत सव्वा लाखांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 11:45 PM