मीरारोड - हवेतून पसरणारा क्षयरोग हा संसर्गजन्य आजार भारतातील सामाजिक आरोग्याचा एक ज्वलंत प्रश्न झाला आहे. संपूर्ण जगातील टीबी रुग्णांपैकी साधारण २०% (एक पंचमांश) रुग्ण भारतात आहेत. भारतात दरवर्षी साधारण १९ लाख नागरिकांना टीबीची लागण होते अशी माहिती जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मीरारोड च्या वोक्हार्ट रुग्णालयाने आयोजित क्षयरोग जनजागृती आठवड्या प्रसंगी दिली.
भारतातील एक तृतीयांश लोकांच्या शरीरात टीबीचे जंतू असतातच, पण या सर्वांनाच टीबी होत नाही. याचे कारण हे जंतू निद्रिस्त स्वरूपात असतात. पण जर काही कारणाने प्रतिकारशक्ती कमी झाली तर मात्र हे निद्रिस्त जंतू जागे होतात, वाढीस लागतात व टीबीची लक्षणे दिसू लागतात. घातक स्वरूपात असलेला ड्रग रेझिस्टंट टीबी हा रोग आपल्याला जेरीस आणत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, रुग्णांपैकी साधारण १/३(एक तृतीयांश) रुग्णांचे योग्य निदान होत नाही, किंवा त्यांना उपचारांसाठी आणले जात नाही. २१व्या शतकात, अत्याधुनिक वैद्यकीय उपचाराच्या जमान्यात मृत्यू आणि क्षयरोग हे समीकरण पुसले गेले पाहिजे होते परंतु दुर्दैवाने दारिद्रय, कुपोषण, आहाराच्या चुकीच्या सवयी, दाट लोकवस्ती, कोंदट घरे, स्वच्छतेचा अभाव, दीर्घकालीन उपचार अर्धवट सोडणे, चुकीचे उपचार, एड्स अशा अनेक कारणांनी टीबीचा आलेख भारतात उंचावत आहे.
क्षयरोगाचे निदान न झालेला, उपचार न घेतलेला वा अर्धवट, चुकीचे उपचार घेतलेला एक रुग्ण वर्षभरात जवळच्या १० ते १५ लोकांना टीबीची लागण करत असतो म्हणूनच आपल्या लक्षात येईल की, टीबीचा रुग्ण शोधणे व योग्य उपचार करणे हे त्या रुग्णाच्या आयुष्यासाठीच केवळ महत्त्वाचे नाही, तर समाजाच्या आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे.
अशाच एका झिम्बाब्वे देशामधील २००९ साली टीबीची लागण झालेल्या नागरिकाला वाचविण्यात यश आले आहे. झिम्बाब्वेमधील पेशाने शिक्षक असलेले सुमानिया तोशिगंधा ( वय ४१) गेल्या ६ महिन्यापासून छातीच्या दुखण्यामुळे त्रस्त होते. त्यांच्या छातीमधून पस (पु ) निघत असल्यामुळे नाकपुडीद्वारे एक कायमस्वरूपी नळी बसविली होती. झिम्बाब्वे येथे अनेक उपचार झाल्यानंतर त्यांच्यात कोणतीही सुधारणा झाली नव्हती. उपचाराला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या पत्नीने मुंबईतील डॉक्टरांची मदत घेण्याचे ठरविले. ३० वर्षांचा अनुभव असलेले मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे कार्डिओव्हेस्क्युलर व थोरासिक शल्यचिकित्सक डॉ. सुहास पारीख यांच्याशी वैद्यकीय सल्लामसलत झाल्यावर सुमानिया तोशिगंधाना मुंबईला हलविण्याचा निर्णय झाला. सहा महिने बेडवर असल्याने रुग्णाची प्रकृती खूपच खालावली होती व अशा परिस्थितीत त्यांना भारतात हलवायचे म्हणजे फारच जिकरीचे होते परंतु त्यांच्या पत्नीने ही जबाबदारी पार पाडली.
याविषयी अधिक माहिती देताना डॉ सुहास पारीख सांगतात, सुमानिया तोशिगंधा यांना २००९ साली टीबी रोगाची लागण झाल्याची नोंद त्यांच्या रिपोर्टमध्ये आढळली होती. दरदिवशी त्यांच्या छातीतून २०० मिलीलीटर पु निघत असे. टीबीच्या विषाणूंमुळे त्यांचा डावीकडचा फुफ्फुसांचा भाग पूर्णपणे निकामी झाला होता त्यामुळे तो डावे फुफ्फुस काढण्याचा पर्याय आमच्याकडे शिल्लक होता. १५ दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर आम्ही तो काढण्यास यशस्वी ठरलो असून त्यांच्या प्रकृतीत उत्तम सुधारणा झाली आहे. गेल्याच आठवड्यात ते परत आपल्या मायदेशी परतले आहे. टीबी या रोगावर जर आपण पूर्णपणे उपचार केले नाहीत तर तो केंव्हाही परंतु शकतो व जेंव्हा तो परततो त्यावेळी त्यावर उपचार करणे फार जिकरीचे होते .