- कुमार बडदेमुंब्रा : घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे बाधित झालेल्या दिव्यातील आपदग्रस्तांपैकी काही मोजक्याच बाधितांना ठामपाची मदत मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने ‘लोकमत’मधील गेल्या दोन दिवसांतील वृत्तावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. दिव्यातील आपादग्रस्त कुटुंबांची संख्या २२ हजार असतानाही प्रशासनाने मात्र तेथील अवघ्या तीन हजार कुटुंबांना पाच किलो पीठ, पाच किलो तांदूळ तसेच डाळ, तेल, साखर, बटाटे, मीठ अशी खाद्यपदार्थांची मदत केली. बाधित कुटुंबापैकी ज्या कुटुंबांना मदत मिळाली ते काही प्रमाणात समाधानी असल्याची माहिती मदत मिळालेल्या चैत्रेश म्हसकर या तरु णाने दिली.परंतु आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांनी ती कधी मिळणार असा प्रतिप्रश्न त्याने केला. ज्यांना मदत मिळाली नाही त्या फौजदार यादव या वृद्धाने मोजक्याच कुटुंबांना मदत करु न मदतीच्या नावाखाली प्रशासनाने क्रुर चेष्टा केल्याची संतप्त प्रतिक्रि या व्यक्त केली. फक्त दिव्यातील बाधिताची संख्या २२ हजारांच्या घरात असताना ठामपा क्षेत्रातील फक्त १० हजार बाधित कुटुंबांनाच मदत केल्याची माहिती एका अधिका-याने दिली.रविवारी ४ आॅगस्ट रोजी दिव्यातील बहुतांश भागातील चाळी तसेच काही इमारतीच्या तळमजल्या वरील घरांमध्ये सहा फूटाहून अधिक पाणी भरले होते. पाणी शिरलेल्या घरांतील कुटुंबांना ठामपाने जाहीर केल्याप्रमाणे अन्नधान्यांचे वाटप दिवा प्रभाग समितीच्या कार्यालयात केले गेले. मदत मिळवण्यासाठी पुरावा म्हणून प्रशासनाने टॅक्स पावती,आधारकार्ड किंवा विद्युत देयक याची पडताळणी करून मदत दिली. सर्व पुरावे असूनही मदत न मिळालेल्यांना कधी मदत मिळणार या प्रश्नावर प्रशासकीय अधिकारी निरुत्तर आहेत.
दिव्यातील १९ हजार कुटुंबे पालिकेच्या मदतीपासून वंचित, तीन हजारांनाच मिळाला लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 1:37 AM