अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊन काळात रेल्वे प्रवाशांची संख्या घटली आहे. असे असतानाही जानेवारी ते मे २०२१ दरम्यान रेल्वे प्रवासात मोबाइल व इतर साहित्यांची चोरी असे जबरी चोरीचे १९० गुन्हे कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यातील १२ गुन्हे हे मोबाइल जबरी चोरीचे आहेत. विशेष म्हणजे, सर्वाधिक गर्दी असलेल्या डोंबिवली रेल्वेस्थानकात मात्र तीन महिन्यांत एकही मोबाइल चोरीचा गुन्हा दाखल झालेला नाही.
कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. डी. शार्दूल म्हणाले की, कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कल्याण ते बदलापूर व कसारा मार्गावरील विविध स्थानकांत जानेवारी २०२१ ते ३१ मे २०२१ पर्यंत १७८ मोबाइल चोरी, तसेच १२ मोबाइलसह जबरी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी जबरी चोरीच्या सर्व १२ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. त्यातील १२ चोरांना अद्दल घडविली आहे, तसेच केवळ मोबाइल चोरीचे गुन्हे असलेल्या १७८ पैकी ३२ गुन्ह्यांची उकल केली असून, त्यातील ३३ चोरांना अटक केली असून, अन्य गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरू आहे. आंबिवली- शहाडदरम्यान अभिनेत्री अंजिता अधिकारी यांचा मोबाइल चोरीला गेला होता. या गुन्ह्याचा शोध वेगाने सुरू असून, लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार म्हणाले की, काही महिन्यांत मोबाइल चोरीचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे मोबाइल चोरीच्या गुन्ह्याची आकडेवारी दीड वर्षाच्या तुलनेत शून्यावर आली आहे.
------------