- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका मालमत्ता कर विभागाने मालमत्ता कराचे बाऊन्स झालेल्या १९३ धनादेश प्रकरणी आक्रमक भूमिका घेऊन संबंधितांना १५ दिवसाच्या नोटिसा पाठविल्या आहेत. त्यानंतर मालमत्ताधारकांनी पैसे दिले नाहीतर पालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे संकेत उपायुक्त प्रियंका राजपूत यांनी दिली.
उल्हासनगरात मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त प्रियंका राजपूत यांनी थकबाकीदार मालमत्ताधारका विरोधात आक्रमक भूमिका देऊन मोठया थकबाकीधारकांना नोटिसा दिल्या आहेत. जानेवारी महिना अखेर मालमत्ता कर विभागाची एकून वसुली ५० कोटीच्या आसपास असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच अभय योजनेचा प्रस्ताव महापालिकेत मंजूर झाला असलातरी, त्याच्या अंमलबजावणीचा चेंडू आयुक्तांच्या कोर्टात आहे. तर राजकीय पक्षनेते अभय योजना सुरू करण्याची मागणी आयुक्तांकडे करीत आहेत. मालमत्ता कराचे बाऊन्स झालेल्या चेक प्रकरणी उपायुक्त राजपूत यांनी संबंधित मालमत्ताधारकाना नोटिसा दिल्यानंतर, मालमत्ता कर १५ दिवसात अदा करा. असे बजावले आहे. त्यानंतर मालमत्ता जप्त करणे, लिलाव करणे आदी प्रक्रिया करण्याचे संकेत उपयुक्तांनी दिले.
दरम्यान मालमत्ता कराचे दिलेले १९३ चेक बाऊन्स करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेनं सुरू केली. १५ दिवसाची नोटीस दिल्यानंतर मालमत्ता कर भरला नाहीतर, महापालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याप्रकाराने थकबाकी मालमत्ताधारकात खळबळ उडाली असून राजपूत यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे वसुलीचे टार्गेट महापालिका पार करते का? असा प्रश्नही विचारला जात आहे. आता पर्यंत मालमत्ता कर विभागाने अश्या दोन करबुडव्यांवर गुन्हा दाखल केला. तसेच आणखी ३ ते ४ जणांवर लवकरच गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती कर विभागाच्या प्रमुख व उपायुक्त प्रियांका राजपूत यांनी दिली. त्यामुळे आता तरी हे करबुडवे मालमत्ता कर भरतात का? हे पाहावं लागणार आहे.