ठाणे : बहुप्रतिक्षित असलेला दहावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा या निकालात १.९३ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे निकालावरुन स्पष्ट होत आहे. गेल्यावर्षी हा निकाल घसरला होता. यंदा निकालात पुन्हा वाढ झाली आहे. २०२३ रोजी दहावीचा निकाल ९३.६३ टक्के होता. यंदा या निकालात १.९३ टक्क्यांनी वाढ होत ९५.५६ टक्के लागला असल्याचे दिसून येत आहे.
सोमवारी निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून निकालात वाढ झाल्याचेही पाहायला मिळत आहे. मुला आणि मुलींच्या दोघांच्या निकालात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी मुलांचा निकाल ९१.९८ टक्के लागला होता तो वाढून यंदा तो ९४.३९ टक्क्यांवर पोहोचला. या निकालात २.४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे गतवर्षी मुलींचा निकाल ९५.३८ टक्के लागला होता. यंदा १.४१ टक्क्यांनी निकाल वाढून तो ९६.७९ टक्के इतका लागला आहे.
गतवर्षीपेक्षा यंदा परिक्षेला बसणारे आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या देखील अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. यावर्षी परिक्षेला १,१३,४०३ इतके विद्यार्थी परिक्षेला बसले होते तर गेल्यावर्षी ही संख्या १,११,१८२ इतके विद्यार्थी बसले होते. २२२१ इतक्या संख्येने यंदा विद्यार्थ्यांची संख्या वाढली. यावर्षी १,०८,३७८ इतके विद्यार्थी परिक्षेत उत्तीर्ण झाले तर गेतल्यावर्षी ही संख्या १,०४,१०२ इतकी हती. ४,२७६ इतकी वाढ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत झाली आहे.