- जितेंद्र कालेकर ठाणे - मोघरपाड्यातील कासारवडवलीमधील जागा मालकासोबत असलेल्या वादामुळे एसएसएम बिल्डर्सला सदनिका विक्री करण्यास न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही सदनिकेची विक्री करून मुलुंडच्या आशिष बनसोडे यांच्यासह दोघांची एक कोटी ९५ लाख ६७ हजारांची फसवणूक करणाºया बिल्डर सुरेश म्हात्रे (४९, रा. गुलमोहर, नौपाडा, ठाणे) याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांनी मंगळवारी दिली. म्हात्रे याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.
एसएसएम डेव्हलपर्सचा मालक सुरेश म्हात्रे याचा कासारवडवलीतील मोघरपाडा येथील जागा मालकासोबत झालेल्या वादामुळे जागा मालकाने दिवाणी न्यायालयात ४ जानेवारी २०१४ रोजी दावा दाखल केला होता. याच दाव्याच्या निकालानुसार म्हात्रे याला या जागेवरील सदनिकांची तिस?्या व्यक्तीला विक्री करण्यास मनाई आदेश न्यायालयाने दिला होता. तरीही, २३ फेब्रुवारी २०१६ ते २१ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मुलुंडचे रहिवासी आशिष बनसोडे (४४) यांच्याकडून ९९ लाख ८४ हजार ९५९ इतकी रक्कम घेतली. तसेच, सचिन महाजन यांच्याकडून ९५ लाख ८२ हजार ७४२ इतकी रक्कम घेतल्याचा आरोप आहे. या दोघांचाही म्हात्रे याने विश्वास संपादन करून या दाव्याची बाब त्यांच्यापासून लपवून ठेवून त्यांच्याकडून ५३ लाख ५४ हजारांची रक्कम घेतली. त्यांनी फ्लॅटची मागणी करू नये, म्हणून त्यांना जून २०१९ ते डिसेंबर २०१९, असे सहा महिने दरमहा ४४ हजार २३१, असे तीन लाख नऊ हजार ६१७ इतका ईएमआय देऊन त्यांचे ५० लाख ४४ हजार ३८३ रुपये घेतले. मात्र, सदनिकेचा ताबा न दिल्याने यातील बनसोडे यांनी सदनिकेसाठी म्हात्रे याला दिलेले होमलोनचे व्याज ३४ लाख ४८ हजार ९२८ अधिक डाऊन पेमेंटचे १५ लाख ५४ हजार रुपये आणि त्यावरील १२ टक्के व्याज याप्रमाणे १४ लाख ९१ हजार ६४८ रुपये, असे मिळून ९९ लाख ८४ हजार ९५९ रुपये घेतले.
महाजन यांच्याकडून पेरी विंकल प्रोजेक्टमधील डी विंगमधील सदनिकेसाठी ९५ लाख ८२ हजार ७४२ रुपये घेतले. अशी या दोघांकडून एक कोटी ९५ लाख ६७ हजारांची रक्कम घेऊन या रकमेचा अपहार करून दोघांचीही फसवणूक केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर बनसोडे यांनी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी फसवणुकीसह मोफा कायद्यांतर्गत कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याच प्रकरणात एसएसएम डेव्हलपर्सचे मालक म्हात्रे यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने २१ मे २०२४ रोजी अटक केली.