ठाणे : बुधवारी सकाळी ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. यानिमित्ताने त्यांचे चाहते सुप्रसिद्ध स्वाक्षरी संग्राहक, सह्याजीराव सतीश चाफेकर यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. १९९५ साली त्यांनी दिलीपकुमार यांची पहिली स्वाक्षरी घेतली होती. आपल्या स्वाक्षरीछंदाबद्दल कळताच त्यांनीही त्यांना हसतहसत स्वाक्षरी दिली असल्याची आठवण त्यांनी सांगितली.
चाफेकर हे स्वाक्षरी संग्राहक असून गेली ५३ वर्षे ते मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या गोळा करत आहेत. त्यांनी आतापर्यंत दहा हजारांहून अधिक स्वाक्ष-या संग्रहित केल्या आहेत. १९९५ साली विलेपार्ले येथील एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी त्यांचे भाषणही ऐकले होते. इतका मोठा सुपरस्टार त्यावेळी त्यांना बघावयास मिळाला होता. त्यामुळे त्यांना भेटून स्वाक्षरी घेण्याची संधी त्यांनी सोडली नाही, असे ते म्हणाले. त्यांच्यासोबत त्यांनी स्वाक्षरी घेताना एक फोटोदेखील त्यांच्या संग्रही ठेवला आहे. त्यानंतर चाफेकर यांना त्यांची दोन ते तीन वेळा स्वाक्षरी घेण्याचा योग आला. ते फार कमी बोलत, त्यांच्या स्वाक्षरीला एक प्रकारचा वेग होता. त्यात त्यांचा ठामपणा दिसत होता. सौंदर्याचा उपासक असलेले हे व्यक्तिमत्त्व होते, अशी वैशिष्ट्ये चाफेकर यांनी त्यांच्याबद्दल सांगितली.