मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या नेहरू नगर ह्या सरकारी जागेतील एका घराचे अनधिकृत बांधकाम विरोधात तक्रार न करण्यासाठी ५ हजार ५०० रुपयांची खंडणी घेताना भाईंदर पोलिसांनी दोघा कथित पत्रकारांना सोमवारी अटक केली आहे .
नेहरू नगर मध्ये राहणाऱ्या परवेस जलील खान यांच्या जुन्या घराचे दुरुस्तीचे काम सुरू होते. परवेस व त्याच्या अन्य ४ भावांची एकाच रांगेत स्वतंत्र घरे आहेत . परवेस यांची वहिनी रोझी घरी असताना स्वतःला पत्रकार म्हंणवणारा अरविंद राजभर हा आला व सरकारी जागेत अनधिकृत बांधकाम केल्याने पैश्यांची मागणी केली.
परवेस व त्याच्या भावांना अरविंद सह राहुल सिंग हे दोघे पत्रकार आहोत सांगून बेकायदा बांधकामे केल्याने पालिकेत तक्रार करून तोडायला लावू असे धमकावत २० हजार रुपयांची खंडणी मागितली . तडजोडी नंतर ७ हजार रुपये ठरले. परवेस यांनी भाईंदर पोलिसात तक्रार केल्यावर पोलिसांनी सापळा रचून सोमवारी शिवसेना गल्ली भागात पूर्वीं राजभर व राहुल सिंग ह्या दोघांना साडेपाच हजार रुपयांची खंडणी घेताना रंगेहाथ अटक केली . भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास चालवला आहे.
या आधी सुद्धा भाईंदर पोलिसांनी स्वतःला पत्रकार सांगून खंडणी उकळणाऱ्या अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत . परंतु खंडणी प्रकरणी अटक झाल्यावर त्यांची सखोल व अन्य कोणा कोणा कडून खंडणी वसूल केली गेली याची मात्र चौकशी केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .