- नितिन पंडीत
भिवंडी- शासकीय प्रकल्पात बाधित झालेल्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी शेतकऱ्याकडून तब्बल सहा लाख रक्कमेची लाच स्वीकारल्या प्रकरणी भिवंडी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रंगेहात पकडले. या प्रकरणात भरोडी गावच्या सारपंचासह एका सोने व्यापाऱ्यालाही अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी अटक केलीआहे. चौकशीत या तिघांकडून २ कोटी ३४ लाख ७३ हजार १०० रुपयांचे विविध शेतकऱ्यांकडून घेतलेले सही केलेले कोरे चेक अँटी कारप्शनच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत.
कल्याण कसारा रेल्वे मार्गाच्या भूसंपदानात जमीन बाधित झालेल्या एका शेतकऱ्याकडून जमिनीचा शासकीय मोबदला देण्यासाठी भिवंडी उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी यांनी ९ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार शेतकऱ्याने मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे १६ फेब्रुवारी रोजी तक्रार दिली असता सतत तीन दिवस अँटी कारप्शनच्या अधिकाऱ्यांनी प्रांत कार्यालयात चौकशी केली होती.
तोडजोडीअंती सहा लाख देण्याचे मध्यस्थ खाजगी इसम भरोडी ग्रामपंचायत सरपंच विजय भोईर यांच्या मध्यस्थीने ठरले असता ,खाजगी इसम लक्ष्मण राजपुरोहित यांच्या कडे सहा लाख देण्याचे सांगितले असता लक्ष्मण राजपुरोहित यांच्या कडे दोन लाख रोख व चार लाखांचे धनादेश स्वीकारण्यासाठी विठ्ठल गोसावी यांनी सांगितल्याचे कबूल केल्याने पथकाने वरील तिन्ही जणांना ताब्यात घेत झडती घेतली असता या तिघांच्या ताब्यातून २ कोटी ३४ लाख ७३ हजार १०० रुपये रक्कमेचे ४३ धनादेश मिळून आले आहेत. या कारवाई नंतर महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पितळ या कारवाईने उघडे पडले आहे.