ठाणे : दिव्यातील बेकायदा डम्पिंग ग्राउंड बंद करुन त्याठिकाणच्या जागेचा वापर हा ठाणे महापालिकेच्या योजनेसाठी केले जाईल असा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र याठिकाणच्या जमिनीचा व्यवहार हा झाल्याने एका विकासकाच्या भल्यासाठी फेरबदलाचा प्रस्ताव पटलावर ठेवल्याचा आरोप राष्टÑवादीचे स्थानिक नगरसेवक बाबाजी पाटील यांनी बुधवारी महासभेत केला. विशेष म्हणजे, या ठिकाणचे आरक्षण बदलून त्याबदल्यात ५० लाख चौरस फुटांचा, म्हणजेच तब्बल ५०० कोटींचा टीडीआर घोटाळा भविष्यात होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.दिव्यातील डम्पिंग बंद करुन त्याठिकाणी महापालिकेचे आरक्षण टाकण्याचा प्रस्ताव बुधवारी महासभेसमोर होता. शहर विकास विभागाच्या प्रस्तावावर घनकचरा विभागाचे अधिकारी कसे भाष्य करु शकतात, अशी शंका सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी उपस्थित केली. हा प्रस्ताव नामंजूर करावा, अशी मागणी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी केली. याठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारचे डम्पिंग नकोच, अशी मागणी त्यांनी लावून धरली. परंतु महापालिकेकडे डम्पिंगसाठी हक्काची जागा नसल्याचा मुद्दा उपायुक्त मनीष जोशी यांनी उपस्थित केला. त्यावर भाईंदरपाडा येथे डम्पिंगसाठी तब्बल १५ एकर जागा आरक्षित असतानाही पालिका प्रशासन चुकीची माहिती सभागृहाला का देत आहे, असा सवाल नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला.दरम्यान, दिवा डम्पिंगवर चर्चा सुरु असताना नगरसेवक बाबाजी पाटील यांनी या डम्पिंगच्या आड कसे कारस्थान सुरु आहे, याचा पदार्फाश केला. वास्तविक पाहता, याठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने डम्पिंग बंद करीत असताना यावर २६९ कोटींचा खर्च कशासाठी, असा आक्षेप त्यांनी घेतला. याठिकाणी आधीच तीन ठिकाणची जागा समतल करण्यात आली आहे. आता एकच जागा शिल्लक असल्याने त्यासाठी एवढा खर्च कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. दुसरीकडे या डम्पिंगच्या आड फेरबदलाचा प्रस्ताव मंजूर करुन त्याठिकाणचे आरक्षण बदलण्याचा घाट घातला जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे याठिकाणी तब्बल २० लाख फूट जागा उपलब्ध होणार असून त्याबदल्यात सुमारे ५०० कोटींचा ५० लाख फूट टीडीआर निर्माण होणार आहे. यातून महापालिकेत मोठा घोटाळा भविष्यात होण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली.‘प्रस्ताव पुन्हा सादर करा’शहर विकास विभागाचे अधिकारी प्रमोद निंबाळकर यांनी येथे केवळ एकपटच टीडीआर निर्माण होणार असल्याचे स्पष्ट केले.महापौर मीनाक्षी शिंदे यांनी हा प्रस्ताव तहकूब करुन तो योग्य पद्धतीने तयार करुन सादर करण्याचे आदेश दिले.
दिव्यातील डम्पिंगमधून ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा धूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:37 AM