उल्हासनगर : कॅम्प नं-३ मोहटा देवी येथील महापालिका आरोग्य केंद्रात लसीकरणानंतर २ महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा प्रकार बुधवारी उघड झाला. मुलीचा मृतदेह उत्तर तपासणीसाठी मुंबई येथील जे जे रुग्णालयात पाठविला असून मृत्यूचे नेमके कारण उघड होणार असल्याची माहिती मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३, मीनाताई ठाकरेनगर येथे राहणाऱ्या काजल कुंदन सावंत ही महिला तीची २ महिन्याची मुलगी भक्ती हिला नियमित लसीकरण करण्यासाठी मोहटा देवी येथील महापालिका आरोग्य केंद्रात मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजता आली होती. लसीकरण डोस झाल्यानंतर, ताप आल्यास तापाच्या गोळ्या कशा घ्यायच्या, याबाबतची माहिती आशा वर्करने दिली होती.
खेळणाऱ्या २ महिन्याच्या मुलीला घरी गेल्यावर व तापाची गोळी घेतल्यावर मुलीची तब्येत बिघडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. बुधवारी सकाळी मुलीला मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत झाल्याचे सांगितले. मात्र डॉक्टरांच्या शब्दावर विश्वास न ठेवता, नातेवाईकांनी मुलीला खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे मुलीला मृत घोषित केल्यावर पुन्हा मध्यवर्ती रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करून कारवाईची मागणी केली.
मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांच्या आदेशानुसार संबंधित डॉक्टरांनी झालेल्या प्रकाराची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याला देण्यात आली. तसेच मुलीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी मुलीचा मृतदेह फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणी व शवविच्छेदन साठी जेजे रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलीस पंचनाम्यात मुलीचे ओठ काळे पडले असून मुलीची दातखळी बसल्याचे नमूद केले आहे. तसेच दोन्ही पायाला इंजेक्शन दिल्याच्या खुणा असून मारहाणीचा खुणा नाहीत. मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर वाघमारे यांनी मुलीच्या शवविच्छेदनाच्या फॉरेन्सिक लॅब अहवालानंतर मुलीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची प्रतिक्रिया दिली.
लसीकरण झालेले इतर मुले ठणठणीतमहापालिका मोहटा देवी येथील आरोग्य केंद्रात मयत भक्ती कुंदन सावंत या मुलीसह इतर मुलांचे लसीकरण झाले. मात्र त्यांची तब्येत ठणठणीत असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी अनिता सपकाळे यांनी दिली. लसीकरणनंतर रात्री मुलीच्या तब्येती मधील घटनाक्रम समजल्यास मुलीच्या मृत्यू बाबतचे ठोस कारण सांगता येणार आहे, असे त्या म्हणाल्या.