उल्हासनगर : महापालिकेतून ३१ मे रोजी सेवानिवृत्त झालेल्या तब्बल २० कर्मचाऱ्याना आदरपूर्वक व सत्कार करून कुटुंबाच्या उपस्थित बुधवारी आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानुसार निरोप देण्यात आला. यावेळी त्यांचे अश्रू अनावर झाले होते. सेवानिवृत्त कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते.
उल्हासनगर महापालिकेत अधिकाऱ्यांचे ८० टक्के तर वर्ग ३ व ४ चे ५० टक्के कर्मचारी पदे रिक्त आहेत. अशावेळी ३१ मे रोजी तब्बल २० कर्मचारी महापालिका सेवेतून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आदरपूर्वक निरोप देण्याचे आदेश आयुक्त अजीज शेख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार बुधवारी सेवानिवृत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण आयुष्य महापालिकेला सेवा देणारे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी कुटुंबासह उपस्थित होते. या भावनिक कार्यक्रमात अनेकांना अश्रू अनावर झाले होते. महापालिकेतील सेवेमुळे कुटुंबासह जीवन सुखी गेले असून अनेकांची मुले चांगल्या ठिकाणी नोकरीला लागली आहेत. तर अनेक जणांच्या मुलांनी व्यवसाय क्षेत्रात पर्दापण केले. त्यामुळे महापालिकेचे ऋण कधीच फेडू शकत नाही. अश्या प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.
महापालिकेचे अभियंता अश्विनीकुमार आहुजा, कर्मचारी मिरा भाटीया, हास्सो जयसिंघानी, मधुकर थोरात, भिमराव वाढविंदे, एम. डब्लयू धुळे, के. के. बागडे, आर. के. भोईर, ए. ए. सोनावणे, आर. डी. मंडूळा, राजेंद्र सोनावणे, रमेश सुरोशी, विद्या झोपे, निर्मला हेमरानी, गुलाब मराठे, देविदास केदार, दिलीप ससाणे, फत्तूमल करारा. सुधाकर शेलार, भगवान वाहुळे आदींचा सेवापुर्ती समारंभ प्रशासक तथा आयुक्त अजीज शेख यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी अतिरिक्त आयुक्त करूणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, सहायक आयुक्त अच्युत सासे, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे आदीजन उपस्थित होते.