पंकज रोडेकरठाणे : शहरात विनयभंग आणि बलात्कारांचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मागील दोन वर्षांत रेल्वे प्रवासात तब्बल २० महिलांसोबत छेडछाडीचे प्रकार घडल्याचे शासकीय आकडेवारीवरून समोर आले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तातडीने त्या रोमिओंवर कारवाई करून अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे लोहमार्ग पोलिसांची हद्द कोपरी पुलापासून सुरू होते. ती दिवा आणि कोपरी रेल्वे स्थानकांच्या मधोमध अशी आहे. तसेच दिवा रेल्वे स्थानकापासून पुढे क ळंबोली आणि ठाणे ते ऐरोली अशी पसरली आहे. त्यातच ऐतिहासिक असलेल्या या ठाणे रेल्वेस्थानकातून लोकलसह एक्स्प्रेस अशा रेल्वेतून दररोज सहासात लाख प्रवासी येजा करतात. या लोकसंख्येच्या तुलनेत लोहमार्ग पोलिसांचा फौजफाटा खूपच कमी आहे. त्यातच रेल्वे प्रवासात मोबाइलचोरीच्या घटनांची संख्या दिवसागणित ८ ते १० अशी आहे. त्यातच, ९-१० रेल्वेस्थानकात रेल्वे प्रवासादरम्यान २०१६ साली ११ तर, २०१७ या वर्षात ८ गुन्हे असे मागील दोन वर्षांत एकूण १९ महिलांसोबत छेडछाडीचे प्रकार घडले आहेत. याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यावर त्या सर्व प्रकरणांतील आरोपींना अटक झाली आहे. तर, २०१८ या वर्षातील जानेवारी महिना संपतासंपता एक छेडछाडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी नालासोपाºयातील अठरावर्षीय तरुणीने थेट टिष्ट्वटद्वारे मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे हा प्रकार जास्त गाजला. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारीत वर्णन केलेल्या अनोळखी व्यक्तीसारख्या दिसणा-या व्यक्तीचे पाच फुटेज काढले. ते फुटेज त्या तरुणीला दाखवल्यानंतरही त्याची ओळख अद्यापही पुढे आलेली नाही. त्यामुळे हा आरोपी गर्दुल्ला किंवा सराईत गुन्हेगार नसावा, असा कयास पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.