ठाणे: आपल्याच १३ वर्षीय पुतणीवर लैंगिक अत्याचार करुन तिला १८ आठवडयांची गरोदर करणाऱ्या ३० वर्षीय चुलत्याला ठाणे न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची तसेच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाचीही शिक्षा आरोपीला भोगावी लागणार आहे.
कळव्यातील शिवाजीनगर भागात १८ आॅक्टोबर २०२२ मध्ये हा घृणास्पद प्रकार घडला होता. आरोपीने या १३ वर्षीय मुलीवर जून २०२२ मध्ये कळव्यातील अशोकनगर भागात लैंगिक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिला मारण्याची धमकीही दिली होती. ती १८ महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मुलीच्या आईने कळवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर ३० वर्षीय चुलत्याला १८ ऑक्टाेंबर २०२२ रोजी अटक केली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश कानडे यांनी या प्रकरणी तपास केला होता.
याच खटल्याची सुनावणी १३ जून २०२४ रोजी ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात झाली. कळवा पोलिस आणि सरकारी वकील विवेक कडू यांनी आरोपीविरुद्ध पुरावे गोळा करुन आरोपीच्या शिक्षेसाठी जोरदार युक्तीवाद केला. यात सर्व साक्षीदार फितूर झाले. मात्र, डिएनए रिपोर्टच्या आधारावर आरोपीला दोषी मानण्यात आले. त्यानुसार ही शिक्षा देण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक उदय देसाई आणि हवालदार एम. बी. पाटणकर यांनी काम पाहिले.