उल्हासनगर : तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये उभारण्यात आलेल्या २०० बेडच्या कोरोना रुग्णालयातील साहित्य निकृष्ट असल्याचा आरोप मनसेने केला. या प्रकरणी आरोग्य विभाग व सबंधित अधिकारी यांची चौकशी केल्यास मोठे घबाड उघड होणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी दिली आहे.
उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने महापालिकेने तहसील कार्यालयाच्या नवीन इमारती मध्ये २०० बेडचे कोरोना रुग्णालय उभारत आहे. रुग्णालयात रुग्णासाठी वापरण्याचे बेड, गादी व इतर साहित्य निविदा प्रमाणे देत नसून साहित्य निकृष्ट पुरविल्याचा भांडाफोड मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी केला. महापालिका आरोग्य विभाग व सबंधित अधिकारी यांची चौकशी केली असता, मोठा भ्रष्टाचार बाहेर येणार असल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिका प्रशासन व सत्ताधारी यांच्यात सुसंवाद नसल्याने, रुग्णाची परवड होत असल्याची प्रतिक्रिया कदम यांनी दिली. अभ्यासिका, टाटा आमंत्रण इमारत, विमा कामगार, आयटीआय कॉलेज व शहर पूर्वेतील कोरोना रुग्णालयातील रुग्ण दररोज असुविधाचा पाडा वाचत असून असुविधेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत.
महापालिका आरोग्य विभाग टप्प पडला असून नागरिकांचा महापालिका कोविड रुग्णालयावर विश्वास उडत असल्याचे कदम यांचे म्हणणे आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले राजकीय नेते, धनदांडगे उपचारासाठी मुंबईला जात आहेत. मात्र सामान्य नागरिक जाणार कुठे? महापालिकेच्या कोरोना रूग्णालयातील साहित्य व सुखसुविधावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. एकूणच महापालिका आरोग्य विभाग व्हेंटिलेटवर असून रुग्णाची परवड होत आहे. अनेकांना याची किंमत चुकावी लागली आहे. कोरोना रुग्णाच्या उपचार व सुखसुविधा साठी राज्य शासनाने सुरवातीला ७० लाख तर नंतर ७ कोटोचा निधी पालिकेला दिला. मात्र महापालिकेने कुठे निधी खर्च केला. याबाबतची काही एक माहिती महापालिका आरोग्य विभाग देत नाही. नवीन आयुक्त महापालिकेला मिळाले. मात्र शहरात काहीएक बदल झाला नसल्याचे कदम यांचे म्हणणे आहे.
कोरोना रुग्णांचा हल्लाबोल
महापालिकेने उभारलेल्या कोरोना रुग्णालयातील रुग्ण असुविधेचा पाडा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करीत आहे. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची संख्या अपुरी असून जेवण, गरम पाणी, साफसफाई आदी बाबत हल्लाबोल करीत असल्याचे चित्र सर्वत्र आहे.