पंढरीनाथ कुंभार, भिवंडीशहरातील स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयास २०० बेडची शासनमान्यता मिळाली असून केवळ रुग्णालयाची इमारत शासनाकडे हस्तांतरित न झाल्याने सुविधा रखडल्या आहेत.शहरात रुग्णालयाची मुहूर्तमेढ तत्कालीन नगराध्यक्ष स्व. परशुराम टावरे यांनी १७ जानेवारी १९७८ या दिवशी भूमिपूजन करून रोवली. तर, स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन २८ डिसेंबर १९८५ रोजी झाले. या दिवसापासून ५० बेडचे रुग्णालय व प्रसूतिगृह भिवंडी नगरपालिका चालवत होती. शहरात लोकसंख्येत वाढ झाल्यानंतर नगरपालिकेची महानगरपालिका झाली आणि मनपास रुग्णालय चालविणे कठीण झाले. त्यामुळे नगरसेवकांनी व प्रशासनाने यंत्रसामग्री व साहित्यसामग्री असलेल्या इमारतीसह हे रुग्णालय १ आॅक्टोबर २०११ रोजी शासनास १ रुपया नाममात्र भाड्याने दिले. महानगरपालिकेने आपले रुग्णालय शासनाकडे सोपविणे, ही राज्यातील पहिली घटना होती. शासनाने प्रथम १०० बेडचे रुग्णालय करून रुग्णांना सर्व सुविधा पुरविल्या. मात्र, शहरातील रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णांना उपचाराच्या सोयीकरिता २०० बेडचे रुग्णालय करणे अपेक्षित होते. त्याकरिता रुग्णालय प्रशासन व लोकप्रतिनिधींनी शासनाकडे आग्रह धरला. शासनाने २०० बेडच्या रुग्णालयास मंजुरी दिली. या मंजुरीमुळे रुग्णालयात बेडसह डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार आहे. तसेच रुग्णांना उपचार मिळणे सुलभ होणार आहे. सध्या रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात दररोज १ हजार ते १२०० रुग्ण येत असतात. १७५ बेडवर उपचार सुरू आहे. मात्र, पुरेसे डॉक्टर व कर्मचारी नसल्याने रुग्णांना आवश्यक सुविधा मिळत नाही. त्यामुळे नेहमी रुग्णांना मुंबई-ठाणे येथे पाठविण्यात येते.
२०० बेडचे रुग्णालय रखडले
By admin | Published: January 06, 2016 1:03 AM