ठाणे : ठाणे जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पद्माकर सुखदेवे यांना एक लाखाची लाच घेताना मंगळवारी रंगेहाथ पकडले. त्यांच्या अटकेनंतर ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि भिवंडी या तालुक्यांत एमएमआरडीएअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाचा सुमारे २०० कोटींचा घोटाळा उघड होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.सुखदेवे यांनी टेंडरप्रक्रियेत सर्वच अटीशर्तींना बाजूला ठेवून स्वत:च्या फायद्यासाठी त्यांच्या मर्जीतील कंपन्यांना लाभ होईल, अशी टेंडर प्रक्रिया पूर्ण केली, असा दावा एसीबीच्या अधिकाºयांकडून केला जात आहे.रस्त्याच्या कामाच्या ६० लाखांच्या मंजूर झालेल्या बिलाचा मोबदला म्हणून सुखदेवे याने त्यांच्याकडे पाच लाखांची मागणी केल्याने त्यांनी ठाणे एसीबीकडे तक्रार दाखल केली. मंगळवारी सायंकाळी सुखदेवे याच्या कार्यालय परिसरात सापळा लावला. मागितलेल्या रकमेतील लाखाचा पहिला हप्ता घेताना त्याला रंगेहाथ पकडले. अटक करून बुधवारी ठाणे न्यायालयात हजर केले असता जामिनावर त्याची सुटका झाली. मात्र, सोमवारी आणि गुरुवारी एसीबी कार्यालयात हजर राहण्याबाबत सांगितले आहे.जिल्ह्यात एमएमआरडीएअंतर्गत २०० कोटींच्या कामांसाठी मध्यंतरी टेंडर प्रक्रिया राबवताना, सुखदेवे यांनी त्यांच्या फायद्यासाठी नामांकित कंपन्यांना ती कामे न देता, त्यांच्या मर्जीतील कंपन्यांना कामे देण्यास सुरुवात केली. काही ठेकेदारांनी याविरुद्ध आवाज उठवला होता. त्याबाबतची तक्रार थेट विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार, विखे-पाटील यांनी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करत माहिती मागवली होती. ठेकेदारांनी टेंडर प्रक्रियेची कागदपत्रे पाहण्यास मिळावी, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांच्याकडे केली होती. त्यावेळी खासदारांनीही कागदपत्रे दाखवा, असे संबंधित विभागाला सांगितले होते. मात्र, तरीसुद्धा ती कागदपत्रे दाखवण्यात आली नाहीत. भिवंडीतील १०० कोटी तर कल्याण, अंबरनाथ आणि मुरबाडमधील ९९ कोटींच्या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.सुखदेवे यांना पकडल्याचे समजतात, काही ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात पेढेवाटप केल्याचे समजते.लोकप्रतिधिनींकडे तक्रारी केल्या जात असल्याचा राग काढण्यासाठी सुखदेवे यांनी एमएमआरडीए अंतर्गत झालेल्या कामांची बिले मंजूर करताना, ठेकेदारांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्यातून त्यांनी अतिरिक्त टक्केवारीची मागणी सुरू केली. एकीकडे कामेही मिळत नाहीत आणि केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी अतिरिक्त टक्केवारीची मागणी सुरू झाल्याने अखेर त्यांच्याविरोधात ठेकेदारांमध्ये प्रचंड रोष वाढीस लागला. त्यातूनच, ही तक्रार दाखल झाल्यावर ते रंगेहाथ पकडले गेल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठाण्यात रस्त्याच्या कामात २०० कोटींचा घोटाळा? लाखाची लाच घेताना जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 6:45 AM