ठाणे : शहरातील ज्या भागांमध्ये घंटागाडी पोहोचू शकत नाही, त्या झोपडपट्टी भागातील कचरा गोळा करण्यासाठी कचरावेचक संकल्पना पालिकेने पुन्हा एकदा पुढे आणली आहे.हे कचरावेचक झोपडपट्टी भागातील दोन लाख घरांमध्ये जाऊन ६५० कचरावेचक दिवसाला प्रत्येकी १५०० घरांतून तब्बल २०० मेट्रिक टन कचरा गोळा करणार आहेत. परंतु, रोजच्या रोज हा कचरा गोळा केला जातो किंवा नाही, याची माहिती पालिकेला केवळ एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. प्रत्येक घरासाठी एक क्यूआर कोडकार्ड दिले जाणार असून कचरा उचलताना तो कचरावेचकाच्या मोबाइलवर स्कॅन केला जाणार आहे. त्यामुळे रोजच्या रोज अपडेट पालिकेला मिळणार आहे.महापालिका हद्दीत आजघडीला ७५० मेट्रिक टन कचरा निर्माण होत आहे. परंतु. त्याचे वर्गीकरण अद्यापही योग्य पद्धतीने होताना दिसत नाही. झोपडपट्टी भागात तर आजही ओला आणि सुका कचरा एकत्रितपणे दिला जात आहे. काही ठिकाणी तर घंटागाडी पोहोचत नसल्याने तो रस्त्यावरच पसरलेला असतो. त्यामुळे आता या भागात पोहोचून तो गोळा करण्यासाठी पालिकेने ही पावले उचलली आहेत. आॅगस्ट महिन्यापासून हे काम सुरू केले जाणार आहे.यापूर्वीदेखील पालिकेने कचरावेचकांची संकल्पना पुढे आणली होती. परंतु, प्रत्येक घरातून कचरा उचलला जाईलच, याची शाश्वती पालिकेला नव्हती. त्यामुळे ती बंद केली होती. आता नव्या संकल्पनेनुसार महिला बचत गट, महिला मंडळ, सामाजिक संस्था, वाल्मीकी सामाजिक संस्था, कचरावेचक संथ्यांना हे काम दिले जाणार आहे. त्यानुसार, हे कचरावेचक घरोघरी जाऊन ओला आणि सुका कचरा वेगळा गोळा करणार आहेत. शिवाय, कचरा वर्गीकरणासंदर्भात जनजागृतीदेखील करणार आहेत.केवळ जनजागृतीच केली जाणार नसून प्रत्येक घरातून कचरा गोळा केला जातो अथवा नाही, याची माहिती घेण्यासाठी एक अॅपदेखील विकसित करणार आहे. जे घरोघरी जाऊन कचरा गोळा करणार आहेत, त्यांच्या हाती स्मार्ट फोन दिला जाणार आहे. सुरुवातीला कचरा गोळा करताना ही मंडळी प्रत्येक घराची माहिती, त्याच्या मालकाचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक घेणार आहेत.अॅपद्वारे पालिकेला मिळणार माहितीगोळा केलेली माहिती पालिकेच्या माध्यमातून एका एजन्सीकडे दिली जाणार आहे. ती या माहितीच्या आधारे अॅप विकसित करून क्यूआर कोड विकसित करणार आहे. हे क्यूआर कोडकार्ड स्वरूपात प्रत्येक घरात दिले जाणार आहे. त्यानंतर, ज्या वेळेस कचरावेचक तो गोळा करण्यासाठी घरी जाईल, त्यावेळेस आपल्याजवळील मोबाइलमध्ये क्यूआर कोड स्कॅन करणार आहे. त्यातून, पालिकेला प्रत्येक घरातून कचरा उचलल्याची माहिती मिळणार आहे.
ठामपा गोळा करणार २०० मेट्रिक टन कचरा, झोपडपट्टी विभागासाठी ६५० कचरावेचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 3:06 AM