कल्याण : उल्हास नदीचे वाढते प्रदूषण व त्यावरील उपाययोजनेचा एक भाग म्हणून ग्रास आणि सिल्वर कार्प या दोन जातींचे २० हजार मत्स्यबीज कोलकाता येथून आणून रविवारी उल्हास नदीत सोडण्यात आले. या उपक्रमाच्या वेळी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत व्यक्तींनी आणि विविध समाजसेवी संस्थांनी सहभाग घेतला होता.
उल्हास नदी सध्या ठिकठिकाणी जलपर्णी वनस्पतींनी भरली आहे. नदीतील जलस्रोत कायम ठेवून जलपर्णी नष्ट करण्यासाठी सर्वसमावेशक मार्ग अजूनही उपलब्ध नाहीत. दरम्यान, जलपर्णींच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी सगुणा रुरल फाऊंडेशनला हे काम सोपवण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत रविवारी २० हजार मत्स्यबीज बोटुकली रायते बंधारा येथे उल्हास नदीमध्ये सोडण्यात आले. यामध्ये ग्रास आणि स्कार्प या दोन प्रजातींचे मासे सोडण्यात आले. या प्रजाती नदीच्या पाण्याच्या शुद्धीकरणामध्ये फार मोलाचा सहभाग देतात. कृषिरत्न चंद्रशेखर भडसावळे, कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे, माजी नगरसेवक नितीन निकम, उल्हास नदी बचाव कृती समितीचे अश्विन भोईर, रवींद्र लिंगायत, विवेक गंभीरराव व वालधुनी बिरादरीचे शशिकांत दायमा, उल्हास नदीच्या दोन्ही बाजूंच्या ग्रामपंचायतीचे सदस्य व म्हारळ, वरप, कांबाचे नवनिर्वाचित सदस्य, द वॉटर फाऊंडेशनचे पंकज गुरव व कुमार रेडियीन तसेच अश्वमेध प्रतिष्ठानचे अविनाश हरड, तुषार पवार, दत्ता बोंबे आदी पर्यावरणप्रेमी, उमाई पुत्र या अभियानात सामील झाले होते.
उपाययाेजना करण्यास मदत
उल्हास नदीचे वाढते प्रदूषण व त्यावरील उपाययोजना यावर कृषिरत्न भडसावळे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले तसेच सरकारी पातळीवर उल्हास नदी बचावासाठी ज्या शक्य अशा सर्व उपाययोजना व मदत केली जाईल, अशी ग्वाही कल्याणचे तहसीलदार आकडे यांनी दिली. मासे म्हटले की, फक्त खाण्यासाठी उपयोगात येत नसून ते पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी ही उपयोगी असतात, असे नमूद करताना मासे नदीत सोडत लहानग्यांनीसुद्धा सहभाग नोंदवला.
------------------------------------------------------
फोटो आहे