मुरलीधर भवार, डोंबिवलीकल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात भीषण पाणीटंचाई असल्याने सध्या ३० टक्के पाणीकपात लागू आहे. त्यामुळे पाण्याची बिले वेळेत भरणाऱ्या ग्राहकांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. त्याच वेळी साधारण २२ टक्के पाण्याची चोरी किंवा गळती होते, अशी स्थिती आहे. पण, हा अंदाजही १८ वर्षांपूर्वीचा आहे. वस्तुत: ही चोरी आटोक्यात आणली तर सध्याच्या पाणीटंचाईच्या काळात काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. १८ वर्षांत या चोरीचे आॅडिटच न झाल्याने फुकट्यांची, पाणी चोरणाऱ्यांची चंगळ सुरू आहे आणि दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून त्यांच्यावर कारवाईसाठी सत्ताधारी पक्ष आग्रही असूनही पालिकेने मात्र मौन बाळगले आहे. पाणीचोरांविरोधात कारवाईची मागणी करणाऱ्या सेना सदस्यांनी मनपा क्षेत्रात जवळपास २० हजार बेकायदा नळजोडण्या असल्याचा दावा केला आहे. पण, पालिकेने मात्र पाणीचोरी होतच नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. मनपा क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंध्र्र धरणात पाणीसाठा कमी असल्याने सध्याच्या पाणीकपातीत वाढ होऊन शनिवार-रविवारी पाणीपुरवठा बंद राहील. पालिकेने २५ कोटींच्या टंचाईच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यात बोअरवेल दुरुस्ती, विहिरी स्वच्छ करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर भर आहे. पण, पाणीचोरांवर कारवाईचा कोणताही आराखडा नाही. २० हजार बेकायदा नळजोडण्यांचा दावा खरा मानला, तर साधारण ४० हजार कुटुंबे सध्या फुकटचे पाणी वापरत आहेत. त्यातून महिन्याला जवळपास चार ते पाच कोटी रुपयांचा महसूल बुडतो.पाणीचोरीविरोधात आवाज उठवून सातत्याने पाठपुरावा करणारे सेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी यासाठी २०१० पासून पाच वेळा उपोषण केले. त्यानंतर, खोटी कागदपत्रे सादर करून नळजोडण्या घेतल्याप्रकरणी ९८ गुन्हे दाखल झाले. यात, १२ कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. पुढे बेकायदा नळजोडण्यांवरील कारवाई थंडावली. त्यांच्याशी अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याने चोरांचे फावल्याचा आरोपही झाला. अर्धा इंची बेकायदा नळजोडणीसाठी अधिकारी २५ हजार, तर एक इंची नळजोडणीसाठी ५० हजार रुपये घेतात, असा म्हात्रे यांचा आरोप आहे. पालिका क्षेत्रात पाणीचोरी होत नसून तशी तक्रार मनपाकडे आली नसल्याची लेखी माहितीच म्हात्रे यांना दिली आहे.पाणीपुरवठा शनिवार आणि रविवारी बंद राहणार असल्याने त्या काळात टँकरनेही पाणीपुरवठा होणार नाही, असे प्रभाग अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखड्यानुसार १५ टँकरच्या प्रत्येक प्रभाग क्षेत्रात १० हजार लीटर क्षमतेच्या पाच फेऱ्या होतात. मात्र, ज्या दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार आहे, त्याच दिवशी टँकर मिळणार नसेल; तर इतर दिवशी टँकरने पाणीपुरवठा करून काय उपयोग, असा महिलांचा सवाल आहे.
बेकायदा २० हजार नळजोडण्या!
By admin | Published: February 06, 2016 2:13 AM