कल्याण : तिकीट, इंजिन, डिझेल अशा घोटाळ्यांनी केडीएमटी आधीच बदनाम झाली असताना या उपक्रमाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्रवाशाला २०११चे तिकीट दिल्याची बाब काँग्रेसचे परिवहन सदस्य सुरेंद्र आढाव यांनी परिहवन बैठकीत निदर्शनास आणली. हा नवा तिकीट घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केल्याने सभापती नितीन पाटील यांनी चौकशीचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.कल्याण-खडे गोळवली मार्गावरील बसमधील एका प्रवाशाला मंगळवारी २९ जानेवारी २०११ चे तिकीट दिल्याची घटना मंगळवारी घडली असून, या तिकिटावरून वाहक आणि प्रवासी यांच्यात वाददेखील झाला. संबंधित प्रवाशाने हा प्रकार सदस्य आढाव यांना सांगितला. यावर त्यांनी गुरुवारच्या परिवहनच्या सभेत हा विषय उपस्थित करीत ई तिकिटिंग मशिनच्या देखभाल आणि दुरुस्तीचा ठेका असलेल्या कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी केली. याआधीही तिकीट ८ रुपये असताना ते ६ रुपयाने वितरीत केल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. हा नवीन तिकीट घोटाळा असून त्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. यावर प्रशासनाने यात कोणताही घोटाळा नसून सॉफ्टवेअरमध्ये झालेल्या बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्टीकरण दिले.
प्रवाशाला दिले २०११चे तिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2015 2:32 AM