ठाणे : या वर्षी शनिवार, दि. १४ जानेवारी रोजी रात्री ८.४४ वा. सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार असल्याने मकर संक्रांती रविवार, दि. १५ जानेवारी रोजी आली आहे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. निरयन मकर संक्रांती दरवर्षी १४ जानेवारीलाच येते हे खरे नाही, असेही ते म्हणाले.
सोमण म्हणाले की, सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा मकर राशीत प्रवेश करीपर्यंत ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटे १० सेकंद एवढा कालावधी लागतो. त्यामुळे निरयन मकर संक्रांतीचा दिवस हा पुढे-पुढे जात असतो. सन २०० मध्ये निरयन मकर संक्रांती २२ डिसेंबरला आली होती. सन १८९९ मध्ये १३ जानेवारीला आली होती. १९७२ पर्यंत मकर संक्रांती १४ जानेवारीलाच येत होती. २०८५ पर्यंत मकर संक्रांती कधी १४ ला, तर कधी १५ जानेवारीला येत राहील.
सन २१०० पासून निरयन मकर संक्रांती १६ जानेवारीला येणार आहे. सन ३२४६ मध्ये निरयन मकर संक्रांती चक्क १ फेब्रुवारीला येणार आहे. त्यामुळे निरयन मकर संक्रांती नेहमी १४ जानेवारीलाच येते हे खरे नाही.सूर्याने २१ डिसेंबर २०२२ रोजी उत्तररात्री ३.१८ वाजता सायन मकर राशीत प्रवेश केला. त्या दिवशी रात्र मोठी (१३ तास ३ मिनिटे) व दिनमान लहान (१० तास ५७ मिनिटे) होते.
सन २०२४, २०२७ मध्ये निरयन मकर संक्रांती १५ जानेवारीला तर सन २०२५, २०२६, २०२९, २०३० मध्ये १४ जानेवारीला येणार आहे.