- सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यातील चार उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात ३८ मंडल अधिकारी व तब्बल २०५ तलाठी कार्यरत आहेत. संगणकीय सातबारा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना दोन वर्षांपूर्वी लॅपटॉप मिळाले होते. त्यांचाच वापर ते करीत आहेत. मात्र, नवीन लॅपटॉप मिळणार असल्याचे ऐकीवात आहे. या नवीन, अत्याधुनिक लॅपटॉपचा मात्र जिल्ह्यातील तलाठीवर्गास अद्याप लाभ झालेला नाही.देशात सर्वाधिक सहा महापालिका असलेला ठाणे हा एकमेव जिल्हा आहे. या जिल्ह्याचे शहरीकरण झपाट्याने होऊन जागेला फार महत्व आले आहे. देशभरातील जागेचे महत्व लक्षात घेऊन ऑनलाइन रेकॉर्ड नोंदणीकडे सध्या केंद्र व राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. यास अनुसरून डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील संबंधित मंडल अधिकारी व तलाठी वर्गांच्या लॅपटॉप खरेदीसाठी लाखोंचा निधी मंजूर केला आहे. त्यातून या मंडल अधिकाऱ्यांसह तलाठी वर्गास अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे लॅपटॉप मंजूर केले आहेत. शासनाच्या या लाभासाठी मात्र ठाणे जिल्हा मागे पडल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील सध्याच्या या २०५ तलाठी वर्गास ऑनलाइन सातबारा देण्यासह त्यांच्या पातळीचे सर्व दाखले, फेरफार, संगणक नोंदी, शैक्षणिक दाखल व आठ ए खाते आदी ऑनलाइन दाखले मिळवून देण्यासाठी शासनाने गेल्या दोन वर्षांपूर्वी लॅपटॉप दिले आहेत. त्यावर तलाठी वर्गाचे जिल्ह्यात कामकाज सुरू आहे. मात्र, या नवीन लॅपटॉपचा लाभ मिळणार असल्याची साधी चुणकही त्यांना आजपर्यंत लागली नाही, असे वास्तव या लॅपटॉप संदर्भात ठिकठिकाणी चौकशी केली असता निदर्शनात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मंडल अधिकारी, तलाठी या लॅपटॉप लाभापासून वंचित असल्याचे उघड झाले आहे.
सातबारा, मालमत्तांच्या नोंदणीसाठी लॅपटॉप पडताहेत उपयुक्तजिल्ह्यात ठाण्यासह भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर आदी चार उपविभागीय अधिकारी कार्यक्षेत्रांत ३८ मंडल अधिकाऱ्यांसह २०५ तलाठी कार्यरत आहेत. ठाणे उपविभागीय कार्यक्षेत्रामध्ये ठाण्यासह मीरा-भाईंदर समाविष्ट आहे. याशिवाय भिवंडीत भिवंडी व शहापूर तालुक्याचा समावेश आहे. तर कल्याण उपविभागीय कार्यालयांतर्गत मुरबाड आणि कल्याण तालुका आहे. उल्हासनगर उपविभागीय कार्यालयाच्या नियंत्रणात अंबरनाथ आणि उल्हासनगर तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये मंडल अधिकारी व त्यांच्या नियंत्रणातील तलाठी सध्या जिल्हाभर कार्यरत आहेत. त्यांच्याकडून जमीन व मालमत्तेच्या नोंदीसह विविध दाखल्यांची उपलब्ध नागरिकांना पूर्तता करून दिली जात आहे. त्यासाठी लॅपटॉपचा वापर उपयुक्त ठरला आहे.
जिल्ह्यातील सर्व तलाठीवर्गास स्वत: खर्च करून नवीन लॅपटॉप घेण्यासाठी आम्ही सतत प्रोत्साहन देत आलेलो आहे. त्यास प्रतिसाद देत बहुतांशी तलाठ्यांनी स्वखर्चाने लॅपटॉप घेतले आहेत. मात्र, नवीन मिळणार असल्याचे सध्या तरी ऐकायला मिळाले नाही. - डॉ. शिवाजी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी, ठाणे
शासनाकडून पुन्हा नवीन लॅपटॉप मिळणार असल्याचे आजपर्यंत तरी कळले नाही. दोन वर्षांपूर्वीच्या लॅपटॉपवरच तलाठी त्यांचे कामकाज करीत आहेत. त्याव्यतिरिक्त नवीन लॅपटॉप मिळणार, असे शासनाकडून कळवण्यात आले नाही. - मोहन नळदकर, उपविभागीय अधिकारी, भिवंडी
गेल्या दोन वर्षांच्या कालावधीपासून आम्हाला शासनाने लॅपटॉप दिले आहेत. त्यावर ऑनलाइन कामांसह नागरिकांना त्यांचे संगणकीय दाखलेही उपलब्ध करून देत आहोत. परंतु, शासन नवीन लॅपटॉप देणार असल्याची चर्चा अजून तरी ऐकायला मिळाली नाही. - शरद सोनवणे, तलाठी - उल्हासनगर