ठाणे : उल्हासनगरमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. भाजपच्या २१ विद्यमान नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. यासोबतच १९ माजी नगरसेवकांनीदेखील हातावर घड्याळ बांधलं आहे. भाजपचे आणखी १० नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे उल्हासनगरमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले सर्व नगरसेवक आज स्वगृही परतले आहेत. या बदललेल्या समीकरणामुळे उल्हासनगरमध्ये आता पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी कलानी कुटुंबाची मध्यरात्री बंद दाराआड चर्चा केल्यानंतर शहरात राजकीय घडामोडीला वेग आला होता. राष्ट्रवादी पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्षा सोनिया धामी यांची मंगळवारी रात्री प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती केल्यावर, शहरजिल्हाध्यक्ष पदी कोण? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. आज बुधवारी पंचम कलानी यांनी भाजप नगरसेवक पदाचा राजीनामा महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे दिल्यावर, त्यांची राष्ट्रवादीच्या शहरजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पंचम कलानी यांनी आज आपल्या इतर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
पक्षांतर बंदी कायदा असल्यानं सध्या उल्हासनगर महानगरपालिकेतील चित्र फारसं बदलणार नाही. मात्र पुढील निवडणुकीत राष्ट्रवादी जोरदार मुसंडी मारेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उल्हासनगरमध्ये पुढील महापौर राष्ट्रवादीचाच असेल, असा विश्वास पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये आगामी महापालिका नगरपालिका निवडणुका या महाविकास आघाडी एकत्र लढवेल, असं जितेंद्र आव्हाड नगरसेवकांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात म्हणाले. त्यामुळे पुढील निवडणुका रंगतदार होण्याची शक्यता आहे.