ठाणे - ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मागील वर्षी एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता मागील महिनाभरात याच रुग्णालयात नवजात २१ बालके दगावल्याची माहिती समोर आली आहे. या नवजात बालकांचे वजन कमी असल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.
रुग्णालयात गेल्या जून महिन्यात ठाणे व पालघर जिल्ह्यांतील ५१२ महिला प्रसूतीसाठी आल्या होत्या. त्यातील ९० महिलांची नोंदणी ही रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांची आहे. तर उर्वरित इतर जिल्ह्यांतील होत्या. त्यातील २९४ या सिझरिन प्रसूती होत्या. त्यातील प्रसूती झालेल्या महिला रुग्णांपैकी आठ नवजात बालकांचा ४८ तासांत मृत्यू झाला होता, तर पूर्ण जून महिन्यात २१ नवजात बालकांचा मृत्यू झाला. जूनमध्ये मृत्यू झालेल्या २१ मुलांचे वजन दीड किलोपेक्षा कमी असल्याची माहिती प्रशासनाने दिली. ठाणे व पालघर जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती असलेल्या प्रसूतीसाठी महिला दाखल झाल्या होत्या. ९० नवजात शिशुचे वजन एक किलोपेक्षा कमी होते. २१ पैकी १९ ही बाहेरची बालके होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असताना, त्यांचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.
रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्हमागील वर्षी ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी तब्बल १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने हे रुग्णालय अधिकच चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा एका महिन्यात तब्बल २१ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे, परंतु या घटनेनंतर कळवा रुग्णालयाचा ताण कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले होते. आजही रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णालयात ५०० खाटा आहेत, तर रोजच्या रोज या रुग्णालयात ४५० हून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. लहान मुलांसाठी अतिदक्षता विभागात सध्या एनआयसीयूमध्ये ३० खाटा आहेत, त्यातील २० खाटा रुग्णालयातील प्रसूतीसाठी नोंदणी झालेल्या महिलांसाठी राखीव आहेत.
चौकशी करून अहवाल केला जाणार सादरया प्रकरणाचा अहवाल रुग्णालयाचे डीन डॉ. राकेश बारोट यांच्याकडून मागविण्यात आला आहे. मृत्यू पावलेल्या नवजात बालकांचे वजन हे दीड किलोपेक्षा कमी असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे, परंतु आता याची चौकशी केली जाईल आणि याचा अहवाल हा सभागृहासमोर सादर केला जाईल.- उमेश बिरारी, उपायुक्त, ठामपा