लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिकेची ७५ हजार लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची टाकी फुटल्याची घटना शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट रोड क्रमांक ३३, रुपादेवी टेकडी येथे घडली. या दुर्घटनेत २१ घरांचे नुकसान झाले. यामध्ये सहा घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तानुबाई श्रवण मुठे (७५) या जखमी झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
वागळे इस्टेट, रोड क्रमांक ३३ येथे २००९ मध्ये बांधण्यात आलेली ऑस्ट्रेलियन बनावटीची ठाणे महापालिकेची ७५ हजार लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची (रिनो टँक) टाकी सकाळी फुटून जवळच असलेल्या झोपडपट्टीतील घरांवर मोठ्या वेगाने कोसळल्याने त्या झोपडपट्टीतील घरांच्या भिंती व छप्पर तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, एनडीआरएफचे अधिकारी व जवान, पोलीस कर्मचारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता (पाणी पुरवठा विभाग, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती) यांच्यासह स्थानिक माजी नगरसेवकांनी धाव घेतली. या दुर्घटनेत तानुबाई मुठे यांच्या उजव्या पायासह उजव्या हाताला व कंबरेला गंभीर दुखापत झाली. त्यांना लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.