लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कल्याण रेल्वेस्थानकात शुक्रवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास आलेल्या कोणार्क एक्स्प्रेसच्या डी-२ बोगीतील एका सीटखाली सापडलेल्या बेवारस बॅगेतून दोन लाख सात हजार रुपये किमतीचा २१ किलो गांजा कल्याण आरपीएफने जप्त केला आहे. गांजाचा हा साठा अमलीपदार्थ विरोधी पथकाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. हा गांजा कोणी आणि कुठून आणला आहे, याचा तपास सुरू आहे.
ओडिशाहून कल्याण स्थानकात येत असलेल्या कोणार्क एक्स्प्रेसच्या डी-२ बोगीतील एका सीटखाली बेवारस बॅग असल्याची माहिती प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला दिली होती. या माहितीची शहानिशा करण्याच्या सूचना आरपीएफला देण्यात आल्या. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कल्याण आरपीएफचे पोलीस ठाण्याचे प्रभारी भूपेंद्र सिंह व त्यांच्या पथकाने कोणार्क एक्स्प्रेस मध्यरात्री २.३० च्या सुमारास कल्याण स्थानकातील ७ नंबर फलाटावर दाखल होताच आरपीएफने सुरक्षेच्या कारणास्तव एक्स्प्रेसची संपूर्ण बोगी रिकामी करत तपासणी केली असता सीटखाली लाल रंगाची ट्रॉली बॅग आणि काळ्या रंगाची सॅक बॅग आढळून आली. आरपीएफ टीमने त्या संशयित बॅगेची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यात २० किलो ७८० ग्रॅम गांजा आढळून आला. हा गांजा अमलीपदार्थ विरोधी विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
------------