ठाणे : नाताळ आणि नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने अवैध हातभट्टी दारू निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच साठा करणाऱ्या गोडवून विरोधात कारवाईचा फास आवळला आहे. कारवाईच्या श्रीगणेशात शुक्रवारी पहिल्याच दिवशी ठाणे जिल्ह्यात एकूण २२ गुन्हे दाखल केले असून १२ जणांच्या हात बेड्या घातल्या आहेत. या विशेष मोहिमेत देशी-विदेशी, ताडी, गावठी दारू आणि रसायन असा २१ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अवघ्या काही दिवसांवर नाताळ आणि त्यानंतर नूतन वर्षाचे आगमन होणार असल्याने त्याचे स्वागत धुमधडाक्यात साजरे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने होते. गेल्या काही वर्षांपासून मद्यप्राशन करून स्वागत करतात. यानिमित्ताने ठाणे जिल्ह्यात अवैध मद्य विक्ती होण्याची शक्यता असल्याने राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाचे अधीक्षक डॉ निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेसाठी सहा पथके तैनात करत त्यानुसार कारवाईचा श्रीगणेशा केला आहे. कल्याण- डोंबिवली , भिवंडी, मीरा भाईंदर मधील उत्तन आदी ठिकाणी हातभट्टी दारू निर्मिती, विक्री विरोधात कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत एकूण २२ गुन्हे नोंदवले असून त्यामध्ये ११ वारस आणि ११ बेवारस गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यात १२ जणांना अटक झाली असून १० लीटर देशी, ०६ लीटर विदेशी,१ हजार १४५ लीटर गावठी दारू, १४० लीटर ताडी, ६४ हजार ८०० लीटर रसायन हस्तगत केले असून एक वाहन ही जप्त केले आहे. असा एकूण २१ लाख २७ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
" नाताळ आणि नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ही विशेष मोहिम हाती घेत कारवाईला सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी अवैध मद्याचा २१ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नागरिकांनी अवैध मद्य घेऊ नये असे आवाहन केले आहे. तसेच यापुढे ही अशाप्रकारे अवैध दारू विक्री, निर्मिती, वाहतूक तसेच साठा करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. "- डॉ निलेश सांगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे.