कल्याण : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध घातले आहेत. मात्र, केडीएमसी हद्दीत नागरिकांकडून त्याचे पालन होताना दिसत नाही. साथ नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने महापालिकेची आणि पोलिसांची पथके प्रभागनिहाय प्रतिदिन विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत आहेत. एप्रिलमध्ये चार हजार ३४२ जणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून २१ लाख ७१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
एप्रिलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर केला. या महिन्यात कोरोनाचे ४१ हजार ५५१ नवे रुग्ण आढळले. त्यापैकी ३७ हजार ६२० रुग्ण महिनाभरात उपचाराअंती बरे झाले, तर १७८ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना दुसरीकडे मात्र नागरिकांचा बेफिकीरपणा चालू होता, हे मास्क न घातल्याप्रकरणी झालेल्या कारवाईतून समोर येत आहे. दरम्यान, मनपा हद्दीतील कोरोनाची साथ नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क परिधान करून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन केडीएमसीने पुन्हा केले आहे.
----------------------
कोरोनामुळे १३ जणांचा मृत्यू
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत बुधवारी नव्या ७८८ कोरोना रुग्णांची भर पडली. २४ तासांत एक हजार ३१९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांची भर पडल्याने सध्या आठ हजार ९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वर्षभरात केडीएमसी हद्दीत एक लाख २४ हजार १२९ रुग्ण आढळले. त्यापैकी एक हजार ४८६ रुग्णांचा मृत्यू झाला, तर एक लाख १४ हजार ५५३ इतके रुग्ण बरे झाले आहेत.
------------------------------------------------------